“तीन तलाकवर कायदा होऊ शकतो, मग मथुरा आणि काशीसाठीही व्हायला हवा”: प्रवीण तोगडिया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 11:38 AM2021-12-04T11:38:52+5:302021-12-04T11:41:49+5:30
अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराबाबत प्रवीण तोगडिया यांनी समाधान व्यक्त केले.
जौनपूर: उत्तर प्रदेशमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (UP Election 2022) राजकारण अधिक तापताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया (Pravin Togadia) यांनी जौनपूर येथील शारदा शक्तिपीठाचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना, तीन तलाकसंदर्भात कायदा होऊ शकतो. मग मथुरा आणि काशीच्या संदर्भात कायदा व्हायला हवा, अशी मागणी प्रवीण तोगडिया यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्तेत आहे. देशात तीन तलाकच्या संदर्भात कायदा मंजूर करण्यात आला. तसाच मथुरा आणि काशीसाठीही कायदा करायला हवा. देश आणि मंदिरे तोडणाऱ्या जिहादींना कठोर शिक्षा व्हायला हवी. त्यांना नेस्तनाभूत करायला हवे, असे परखड मत प्रवीण तोगडिया यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
कायदे करून सरकारने काशी विश्वनाथचा सन्मान करावा
केंद्रातील मोदी सरकारने संसदेत मथुरा आणि काशीसंदर्भात कायदा करून काशी विश्वनाथचा सन्मान करावा. असे केल्यास भाजपला आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीत त्याचा फायदा होईल, असा विश्वास तोगडिया यांनी व्यक्त केला. अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराबाबत प्रवीण तोगडिया यांनी समाधान व्यक्त केले. हिंदूंच्या मोठ्या संघर्षानंतर राम मंदिर आता तयार होत आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. मंदिर तयार होत आहे, हे पाहून समाधान मिळत आहे, असेही तोगडिया म्हणाले.
दरम्यान, राम मंदिर निर्माण करण्यासाठी जसे अभियान राबवण्यात आले. तसेच आता गरिबी मुक्त भारतसाठी विशेष अभियान राबवणे आवश्यक आहे. राम मंदिर आंदोलन सुरू झाले, तेव्हा मी तीन बाबी समोर ठेवल्या होत्या. प्रत्येक हिंदूला अन्न, स्वस्त आणि चांगले शिक्षण, युवकांना रोजगार, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची, पीकांची चांगली किंमत मिळायला हवी, असा प्रस्ताव मांडला होता, याची आठवड तोगडिया यांनी यावेळी बोलताना करून दिली.