"10 मार्चनंतर सपा नेते तोंड लपवण्यासाठी विदेशात जाण्यासाठी तिकीट काढतायेत, पण...", योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 06:20 PM2022-02-25T18:20:39+5:302022-02-25T18:22:01+5:30
Yogi Adityanath : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी प्रयागराजमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पार्टीवर जोरदार निशाणा साधला.
प्रयागराज : सध्या देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. यात सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीवर लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी प्रयागराजमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पार्टीवर जोरदार निशाणा साधला. समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी तोंड लपवण्यासाठी 10 मार्चनंतर परदेशात जाण्यासाठी तिकीट बुकिंग सुरू केले आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
समाजवादी पार्टीवर हल्लाबोल करताना योगी आदित्यनाथ म्हणाले, 'समाजवादी नेत्यांनी तोंड लपवण्यासाठी 10 मार्चनंतर परदेशात जाण्यासाठी तिकीट काढण्यास सुरुवात केली आहे. पण त्यांच्यासमोर एक समस्या निर्माण झाली आहे, कारण काही उड्डाणांवर कोविडमुळे तर काही युक्रेन-रशिया संघर्षामुळे बंदी घालण्यात आली आहे. तसेच, मागील अखिलेश सरकारच्या भावना दहशतवाद्यांबद्दल होत्या. दहशतवाद्यांची वकिली करणाऱ्या या लोकांनी खटले मागे घेण्याचा दुष्ट प्रयत्न केला, असे योगी आदित्यनाथ यांनी जनतेला संबोधित करताना सांगितले.
याचबरोबर, 'आज अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणातील एका दोषीचे वडील समाजवादी पार्टीचा प्रचार करत आहेत. आज समाजवादी पार्टी- बहुजन समाज पार्टीचे सरकार असते तर संपूर्ण कोरोना लसींचा बाजार काळा झाला असता. आम्ही सर्वांना लस दिली, मोफत लस दिली. महिन्यातून दोनदा रेशन दिले. 2017 पूर्वी हे पैसे समाजवादी पार्टी- बहुजन समाज पार्टीच्या परफ्यूम मित्राच्या घरी जायचे', असे योगी आदित्यनाथ म्हणाले. याशिवाय, गेल्या वेळी आम्ही पाच लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या दिल्या आणि दोन कोटी तरुणांना रोजगार दिला. यावेळी आम्ही उत्तर प्रदेशातील सर्व कुटुंबातील एका सदस्याला रोजगार देऊ, असे आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजमधील जनतेला दिले.
SP leaders have started booking tickets to go abroad after March 10 to hide their faces. But a problem has arisen before them as some flights have been banned because of Covid and some because of the Ukraine-Russia conflict: UP CM Yogi Adityanath in Prayagraj pic.twitter.com/2NL6yWt3Hh
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 25, 2022
यूपीमध्ये 300+ जागा जिंकणार, जेपी नड्डांचा दावा
भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा(JP Nadda) यांनी दावा केला आहे की, भाजप पाचपैकी चार राज्यांमध्ये पुन्हा एकदा सरकार स्थापन करेल. त्यांच्या मते, सध्या ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे तेथे सत्ताविरोधी घटक नाही. न्यूज18 इंडियाला दिलेल्या मुलाखतीत जेपी नड्डा म्हणाले की, चार राज्यांमध्ये लाट आमच्या बाजूने आहे. उत्तर प्रदेशात तर भाजप 300 हून अधिक जागा जिंकेल.