लग्नासाठी तयार व्हायला नवरदेव सलूनमध्ये गेला पण घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 15:41 IST2023-06-12T15:33:48+5:302023-06-12T15:41:10+5:30
नवरी वरातीची वाट पाहत होती. पण लग्नाची वरात येण्यापूर्वीच वराच्या मृत्यूची बातमी आली.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये लग्नाच्या दिवशीच नवरदेचा अपघातात मृत्यू झाल्याने दोन कुटुंबांच्या आनंदावर शोककळा पसरली. ही घटना घूरपूर परिसरातील आहे. येथे राहणाऱ्या कमलेश निषादचं 11 जून रोजी लग्न होणार होतं. वरातीची जय्यत तयारी करण्यात आली होती. नवरदेव तयारी करण्यासाठी सलूनमध्ये गेले असता त्याचा अपघात झाला. या अपघातात कमलेशचा मृत्यू झाला.
पोलिसांना या घटनेची माहिती तात्काळ देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून कमलेशचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. दुसरीकडे कमलेशच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना मिळताच तेथे शोककळा पसरली. नववधूलाही धक्का बसला आहे. नवरी वरातीची वाट पाहत होती. पण लग्नाची वरात येण्यापूर्वीच वराच्या मृत्यूची बातमी आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कमलेश हा बोगा बसवार गावातील रहिवासी जोखू निषाद यांचा सर्वात लहान मुलगा होता. तो तामिळनाडूतील एका कंपनीत कामाला होता. आई-वडिलांनी लग्न ठरवलं होतं, 11 जून रोजी लग्न होणार होतं. कमलेश त्याच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक होता. महिनाभरापूर्वी रजा घेऊन तो घरी आला होता. 11 जून रोजी वरात निघणार होती. लग्नसोहळ्याची तयारी पूर्ण झाली होती.
कमलेश त्याच्या पुतण्यासोबत तयार होण्यासाठी सलूनच्या दिशेने गेला. तेथे रस्ता ओलांडत असताना त्याचा पाय डिव्हायडरवर आदळल्याने तो खाली पडला. त्यामुळे मागून येणाऱ्या भरधाव बसने त्याला चिरडलं. चालकाने घाईघाईत ब्रेक लावल्याने कमलेश गंभीर जखमी झाला. लोकांनी लगेच त्याला रुग्णालयात नेले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.