आधीच झाली होती कुंभमेळ्याची सांगता, नंतर जो चालला तो सरकारी...; शंकराचार्यांचा मोठा दावा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 13:42 IST2025-02-27T13:42:12+5:302025-02-27T13:42:58+5:30
खरे तर, यापूर्वीही अविमुक्तेश्वरानंद यांनी कुंभमेळ्यातील स्वच्छता आणि तयारीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहे...

आधीच झाली होती कुंभमेळ्याची सांगता, नंतर जो चालला तो सरकारी...; शंकराचार्यांचा मोठा दावा!
महाशिवरात्रीच्या स्नानाबरोबरच बुधवारी प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याची सांगता झाली. कुंभमेळ्यात देशातील आणि जगभरातील कोट्यवधी श्रद्धाळूंनी प्रयागराज येथे येऊन संगमावर श्रद्धास्नान केले. यातच आता, जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, कुंभमेळ्याची सांगता आधीच झाली होती. आता जे सुरू होते, तो 'सरकारी कुंभमेळा' सुरू होता. खरे तर, यापूर्वीही अविमुक्तेश्वरानंद यांनी कुंभमेळ्यातील स्वच्छता आणि तयारीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, शंकराचार्य म्हणाले, 'पौर्णिमेच्या दिवशीच कुंभमेळ्याची सांगता झाली होती. सध्या जो सुरू आहे तो सरकारी कुंभमेळा आहे. खरा कुंभमेळा माघ महिन्यातच असतो. माघ महिन्याची पौर्णिमा संपली आहे आणि कुंभमेळ्यात उपस्थित असलेले कल्पवासीही माघ महिन्याच्या पौर्णिमेनंतर आधीच परतले आहेत." एढेच नाही तर, आता सुरू असलेल्या सरकारी आयोजनाला तेवढे आध्यात्मिक महत्व नाही, जेवढे पारंपरिक कुंभमेळ्याला असते.
यावेळी जगद्गुरी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद गोहत्याविरोधात आंदोलनासाठी 17 मार्च ही तारीखही निश्चित केली आहे. ते म्हणाले, "आम्ही सर्वच राजकीय पक्षांना एकत्रित येण्यास आणि त्यांना गोहत्या हवी आहे की थांबवायची आहे, हे जाहीर करण्यास सांगितले आहे. कारण स्वातंत्रमिळाल्यापासून ती सुरूच आहे. आम्ही त्यांनी निर्णय देण्यासाठी 17 मार्चपर्यंतचा कालावधी दिला आहे."
गेल्या १३ जानेवारीपासून सुरू झालेल्या या कुंभमेळ्याचा समारोप बुधवारी झाला. एकूण ४५ दिवस चाललेल्या या महाकुंभमेळ्यात जवळपास ६६.३० कोटी भाविकांनी गंगेच्या पात्रात आणि संगमावर स्नान केले. कुंभमेळा प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत १.५३ कोटींहून अधिक भाविकांनी येते स्नान केले.
भाविकांच्या संख्येचा हा आकडा, चीन आणि भारत वगळता, अमेरिका, रशिया आणि यूरोपसह सर्वच देशांच्या लोकसंखेपेक्षा अधिक आहे. याशिवाय हा आकडा मक्का आणि व्हॅटिकन सिटी येथे जाणाऱ्या भाविकांच्या तुलनेतही बराच मोठा आहे.