मुस्लिमांना महाकुंभात प्रवेशबंदी? CM योगी आदित्यनाथ म्हणाले- 'कोणीही येऊ शकते, पण...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 14:50 IST2025-01-10T14:47:42+5:302025-01-10T14:50:56+5:30
Prayagraj Mahakumbh 2025 : 'महाकुंभात जाती-पातीच्या भिंती नाहीशा होतात. इथे कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला थारा नाही. '

मुस्लिमांना महाकुंभात प्रवेशबंदी? CM योगी आदित्यनाथ म्हणाले- 'कोणीही येऊ शकते, पण...'
Prayagraj Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये दर बारा वर्षांनी होणाऱ्या महाकुंभाचे आयोजन मोठ्या थाटामाटात करण्यात आले आहे. देश-विदेशातील असंख्य साधू-संतांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या 13 जानेवारीला महाकुंभाची सुरूवात होईल. दरम्यान, महाकुंभात मुस्लिमांच्या प्रवेशावरुन राजकारण तापले आहे. मुस्लिमांना महाकुंभात प्रवेश देऊ नये, अशी मागणी काही संघटनांनी केली आहे. या सर्व वादावर आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महत्वाचे भाष्य केले.
प्रत्येकाचे महाकुंभात स्वागत, पण...
हिंदी वृत्तवाहिनी आज तकच्या कार्यक्रमात महाकुंभात मुस्लिमांच्या प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री योगी म्हणाले की, 'जो स्वत:ला भारतीय समजतो, मनात भारतीय सनातन परंपरेबद्दल आदराची भावना आहे, ज्यांना भारताच्या चिरंतन परंपरेबद्दल आदर आहे, त्यांनी महाकुंभात यावे, कोणीही रोखणार नाही. पण, जर कोणी चुकीच्या मानसिकतेने महाकुंभात येत असेल, त्याच्यासोबत वेगळ्या पद्धतीचा व्यवहार केला जाईल. त्यामुळे अशा मानसिकतेच्या लोकांनी नाही आले तर बरे होईल. पण भक्तीभावाने येणाऱ्या प्रत्येकाचे महाकुंभात स्वागत आहे', अशी प्रतिक्रिया योगींनी दिली.
महाकुंभात जाती-धर्माच्या भिंती उद्ध्वस्त होतात
सीएम योगी पुढे म्हणाले की, 'महाकुंभला कोणीही येऊ शकतो. महाकुंभ हे एक असे ठिकाण आहे, जिथे जाती-पातीच्या भिंती नाहीशा होतात. इथे कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला थारा नाही. महाकुंभ वसुधैव कुटुंबकमचे विशाल रुप आहे, जिथे देश आणि जगभरातून लाखो भाविक येतात. इथे कोणाशीही भेदभाव केला जात नाही. राज्यात अनेक लोक आहेत, ज्यांच्या पूर्वजांनी दबावाखाली इस्लाम धर्म स्वीकारला होता. पण, आज ते स्वतःला सनातनी मानतात आणि महाकुंभात येऊन पवित्र स्नानाचा अनुभव घेतात. ही जमीन आमची आहे, आम्ही त्यावर कब्जा करू, असे सांगणाऱ्यांना महाकुंभात जागा नाही,' असेही योगींनी यावेळी स्पष्ट केले.
'बंटेंगे तो कटेंगे' ध्रुवीकरणाची घोषणा नाही
योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान एक है तो नेक आहे, बटेंगे तो कटेंगे, अशा घोषणा दिल्या होत्या. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला योगी म्हणाले की, 'हे हिंदू ध्रुवीकरण नाही, हिंदू ध्रुवीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. हे भारताच्या इतिहासाबद्दल आहे. लोकांना इतिहासाकडे पाहण्याची आठवण करून देण्याची ही संधी आहे. एकदा इतिहासाकडे पाहा, तेव्हा तुम्हाला दिसेल की, जेव्हा-जेव्हा आपण विभाजित झालो, तेव्हा गुलामगिरीत अडकलो आहोत. इतिहासाच्या त्या चुकांमधून धडा घेतला तर अशी परिस्थिती पुन्हा कधीच येणार नाही. '
महाकुंभात अदानी समूहाची सेवा; दररोज 1 लाख भाविकांना महाप्रसादाचे वाटप...
स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी महाकुंभात सहभागी होणार; संन्यासी आयुष्य जगणार...