आता 'मोबाइल व्यसनमुक्ती केंद्र', पहिल्याच दिवशी पोहोचले 15 रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 12:19 PM2019-07-17T12:19:00+5:302019-07-17T12:26:08+5:30
प्रयागराज येथील मोतीलाल नेहरू विभागीय रुग्णालयात मोबाइल व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
प्रयागराज - मोबाइल हा जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. एखाद्या वेळी मोबाइल विसरलो, हरवला अथवा चोरीला गेला तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. मात्र हल्ली मोबाइलचा सर्वच ठिकाणी सर्रार वापर केला जातो. त्याचं सर्वांना व्यसन लागलं आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. फोनच्या वेडापायी अनेक दुर्घटना घडल्या आहेत. व्यसनमुक्ती केंद्राबाबत नेहमीच ऐकतो. मात्र आता 'मोबाइल व्यसनमुक्ती केंद्र' सुरू करण्यात आले आहे.
प्रयागराज येथील मोतीलाल नेहरू विभागीय रुग्णालयात मोबाइल व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रात मोबाइल गेम, इंटरनेट, टीव्ही आणि सोशल मीडिया याची मुलांना लागलेली सवय सोडवण्यासाठी काही उपचार केले जाणार आहेत. किशोरवयात मुलांच्या वागणुकीत होणाऱ्या बदलांसाठी मोबाइलचे व्यसन किंवा इंटरनेट हे मूळ कारण असल्याचं मनोरुग्णतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मोतीलाल नेहरू विभागीय रुग्णालयात पहिल्याच दिवशी 15 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. यामध्ये विद्यार्थ्यांचा समावेश हा जास्त आहे.
डॉ. राकेश पासवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांची टिम यावर खूप दिवसांपासून काम करत होती. त्यानंतर हे केंद्र सुरू करण्यात आलं. पहिल्याच दिवशी 15 रुग्ण उपचारासाठी आले होते. त्यांना औषधासोबतच योग्य सल्ला देण्यात आला आहे. त्यांचे समुपदेशन करण्यात आले. रुग्णांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ही जास्त आहे. केंद्रांमध्ये मुलांना लागलेले फोनचे आणि इंटरनेटचे व्यसन सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.
डॉक्टर ईशान्या राज यांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांसोबतच मोठ्या व्यक्तींना देखील फोनचे व्यसन लागले आहे. त्यांच्या मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्यावर त्याचा वाईट परिणाम होत आहे. मोबाइल व्यसनमुक्ती केंद्रामध्ये सध्या सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी उपचार केले जातात. लोकांचं समुपदेशन केलं जातं. तर आठवड्यातील इतर दिवशी डॉक्टरांची टीम विभागात जाऊन मोबाइलच्या व्यसनाची लोकांना माहिती देऊन त्यापासून सावध करत आहे. इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. मोबाइलचा योग्य वापर करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.