अजानमुळे झोपमोड होत असल्याची केली होती तक्रार; आता बदलली लाऊडस्पीकरची दिशा, आवजही कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 11:52 AM2021-03-18T11:52:48+5:302021-03-18T11:54:57+5:30
आवाजामुळे समस्या होत असल्याची कुलगुरूंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती तक्रार
अलाहाबाद केंद्रीय विद्यापीठाच्या (Allahabad Central University) कुलगुरू प्रा. संगीता श्रीवास्तव (Vice Chancellor Prof Sangeeta Srivastava) यांनी अजानमुळे झोपेत अडथळा निर्माण होतो अशी तक्रार केली होती. त्यांनी याबाबत थेट जिल्हाधिकारी भानू चंद्र गोस्वामी यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये श्रीवास्तव यांनी नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. यानंतर आता प्रयागराज येथील सिव्हील लाईन येथे लाल मशिदीवर असलेल्या लाऊडस्पीकरची दिशा बदलण्यात आली आहे. कुलुगुरुंच्या पत्राचं वृत्त समोर आल्यानंतर मिशिदीनंच हे पाऊल उचललं आहे.
"आम्ही सकाळी वृत्तपत्र पाहिलं तेव्हा आम्हाला या आवाजानं कोणाला त्रास होतोय हे वाचून अतिशय दु:ख झालं. त्यानंतर आम्ही सर्वांनी चर्चा करून निर्णय घेतला. कोणाला त्रास होत असताना आपण करत असलेली सेवा योग्य नाही. त्यामुळे आम्ही कुलगुरूंच्या घराकडे असलेल्या लाऊडस्पीकरची दिशा बदलून रोडच्या दिशेनं केली आहे," असं मशिदीत असलेले मोहम्मद कलिम यांनी आजतकशी बोलताना सांगितलं. "पाच वेळा अजान होते. या ठिकाणी सुरुवातीपासूनच लाऊडस्पीकर लावण्यात आले होते. दोन हॉर्नची परवानगीदेखील आहे. परंतु काही दिवसांपूर्वी पोलीस या ठिकाणी आले होते. त्यानं इथे लाऊडस्पीकरचा आवाज मोठा असल्याचं सांगत यामुळे लोकांना समस्या होत असल्याचं म्हटलं होतं. यानंतर लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यात आला," असंही त्यांनी सांगितलं.
"सकाळच्या वेळी वर्दळ कमी असते. गोंगाटही नसतो. त्यामुळे तो आवाज मोठा वाटतो. आता आम्ही लाऊडस्पीकरचा आवाज आणखी कमी केला आहे. आता सकाळच्या वेळी कोणाला त्रास होत असेल तर आम्ही त्याचा आवाज आणखी कमी करू जेणेकरून तो आवाज ५० किंवा १०० मीटरपर्यंतही जाणार नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं. कुलगुरूंच्या निवासस्थानी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांनीदेखील या आवाजामुळे समस्या होत असल्याचं म्हटलं. अजान सकाळी ५ ते साडेपाचच्या मध्ये होते आणि त्याचा आवाजही अधिक असतो. संपूर्ण रात्र जागल्यानंतर सकाळी इतका मोठा आवाज आला तर समस्यातर होणारच असंही पोलिसांनी सांगितलं. कुलगुरू आणि मशिदीतील अंतर हे ३०० मीटर इतकं आहे.
काय म्हटलं होतं कुलगुरूंनी?
"रोज सकाळी साधारण साडे पाच वाजता अजान होते. लाऊडस्पीकरवरुन होणाऱ्या अजानमुळे झोपमोड होते. त्यानंतर अनेक प्रयत्न करुनही झोप येत नाही. त्यामुळे दिवसभर डोकेदुखीचा त्रास होतो. याचा परिणाम रोजच्या कामकाजावरही होत आहे. जिथं माझे नाक सुरु होते, तिथं तुमचं स्वातंत्र्य संपतं. मी कोणताही संप्रदाय किंवा जातीच्या विरोधात नाही. तुम्ही अजान लाऊडस्पीकर शिवायदेखील करू शकता. त्यामुळे दुसऱ्यांची दिनचर्या प्रभावित होणार नाही" असंही कुलगुरूंनी पत्रात म्हटलं होतं.
"आगामी ईदपूर्वी सहरीची घोषणा पहाटे ४ पूर्वी होईल. त्यामुळे त्यांच्या आणि इतरांच्या त्रासामध्ये भर पडेल. भारतीय राज्यघटनेत सर्व पंथनिरपेक्ष आणि शांततापूर्ण सौहार्दाची संकल्पना मांडण्यात आली आहे" याचा उल्लेख देखील या पत्रात करण्यात आला होता. त्याचबरोबर अलाहाबाद हायकोर्टाच्या जुन्या आदेशाचा दाखलाही यामध्ये श्रीवास्तव यांनी दिला होता.