हनुमंतअप्पांसाठी देशभर प्रार्थना
By admin | Published: February 11, 2016 04:14 AM2016-02-11T04:14:28+5:302016-02-11T04:14:28+5:30
सियाचीनमधील उणे ४५ अंश तापमानात ३५ फूट बर्फाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले आणि ६ दिवसांनंतर जिवंत बाहेर काढण्यात आलेले लान्सनायक हनुमंतअप्पा यांची प्रकृती
२४ तास अतिमहत्त्वाचे : प्रकृती आणखी ढासळली
नवी दिल्ली : सियाचीनमधील उणे ४५ अंश तापमानात ३५ फूट बर्फाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले आणि
६ दिवसांनंतर जिवंत बाहेर काढण्यात आलेले लान्सनायक हनुमंतअप्पा यांची प्रकृती क्षणाक्षणाला ढासळत असून, पुढील २४ तास त्यांच्यासाठी अतिमहत्त्वाचे आहेत. मेंदूला आॅक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने तसेच दोन्ही फुप्फुसांना न्यूमोनियाचा संसर्ग झाल्याने हनुमंतअप्पा यांची प्रकृती अद्यापही अत्यंत गंभीर आहे, असे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.
हनुमंतअप्पा यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी देशभर प्रार्थना सुरू आहेत. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी देशवासीयांना हुनमंतअप्पा यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही हनुमंतअप्पा हे लवकर बरे व्हावेत, अशी कामना केली आहे. बुधवारी मुंबईतील डबेवाल्यांसह देशभरात विविध ठिकाणी हनुमंतअप्पांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली गेली. प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरातही महाआरती करण्यात आली.
हनुमंतअप्पा यांच्यावर आर्मी रिसर्च अॅण्ड रेफरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरांचे एक पथक आर्मी रिसर्च अॅण्ड ेरेफरल हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या मदतीने त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा नाही. त्यांच्या शरीरातील अनेक अवयवांचे काम थांबले आहे. न्युमोनियाचा संसर्ग झाल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले आहे.
सियाचीन ग्लेसियरमध्ये बेपत्ता जवानांचा शोध घेणाऱ्या पथकाने बर्फ कापून चालविलेल्या शोधमोहिमेदरम्यान सोमवारी रात्री हनुमंतअप्पा यांना जिवंत बाहेर काढले. त्यांना लगेच एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीला हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तथापि सहा दिवस उणे ४५ अंश तापमानात बर्फाखाली गाडलेल्या अवस्थेत राहिल्याने त्यांचा रक्तदाब कमी झाला असून ते कोमामध्ये गेले आहेत. पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेजवळ १९,६०० फूट उंचीवरील लष्करी चौकीवर २ फेब्रुवारी रोजी हिमकडा कोसळल्यामुळे १० जवान बर्फाखाली गाडले गेले होते.
महिलेने देऊ केली किडनी
लखीमपूर खेरी(उप्र) : रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेले लान्सनायक हनुमंतअप्पा यांच्यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करीत असताना उत्तर प्रदेशातील एका गृहिणीने या शूर जवानास आपली एक किडनी देण्याची तयारी दर्शवली आहे. निधी पांडे असे या महिलेचे नाव असून ती येथून ५० किमी अंतरावरील पदारिया तुला गावात राहणारी आहे.
हनुमंतअप्पांची प्रकृती चिंताजनक असल्याचे तसेच त्यांची किडनी व अन्य अवयव नीट काम करीत नसल्याचे वृत्त निधी यांनी टीव्हीवर पाहिले. देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या या शूर जवानासाठी प्रार्थना नाही तर त्यापेक्षा काहीतरी ठोस केले पाहिजे, असे निधी यांना त्याक्षणाला वाटले. यानंतर निधी यांनी हेल्पलाईनवर फोन करून हनुमंतअप्पा यांच्यासाठी स्वत:ची किडनी देण्याची तयारी दर्शवली.
१० वर्षे सर्वाधिक आव्हानात्मक क्षेत्रात...
तब्बल सहा दिवस उणे ४५ अंश सेल्सिअस तापमान बर्फाखाली गाडलेल्या अवस्थेत राहूनही मृत्यूपुढे हात न टेकवणारे हनुमंतअप्पा एक शूर सैनिक आहेत. लष्कराच्या आपल्या एकूण १३ वर्षांच्या सेवेतील १० वर्षे त्यांनी अत्यंत आव्हानात्मक क्षेत्रात सेवा दिली. ३३वर्षीय हनुमंतअप्पा म्हणजे जिगीषू वृत्तीचे जिवंत उदाहरण आहे. उच्चपे्ररित आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ असलेल्या हनुमंतअप्पा यांनी १० वर्षे अतिशय आव्हानात्मक क्षेत्रात आपले कर्तव्य बजावले, असे लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मोठ्या अभिमानाने सांगितले.
मी संपूर्ण देशवासीयांसह लान्सनायक हनुमंतअप्पा यांच्या दीर्घायुष्याची कामना करते. त्यांनी दाखवलेले अचाट शौर्य, संयम आणि सेवाभावास माझा सलाम.
- सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष
माझ्या शुभेच्छा लान्सनायक हनुमंतअप्पा यांच्यासोबत आहेत. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. ते लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करा.
- मनोहर पर्रीकर, संरक्षणमंत्री