केंद्रीय विद्यालयात संस्कृत आणि हिंदीत प्रार्थना म्हणजे हिन्दू धर्माचा प्रचार? सर्वोच्च न्यायालय म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 05:25 PM2022-09-07T17:25:09+5:302022-09-07T17:25:20+5:30
सुप्रीम कोर्टात दाखल एका याचिकेवरील सुनावणीत शाळेतील प्रार्थनेवर चर्चा झाली.
नवी दिल्ली: केंद्रीय विद्यालयात संस्कृत आणि हिंदीमध्ये प्रार्थना म्हणजे हिंदू धर्माचा प्रसार? सुप्रीम कोर्टात दाखल एका याचिकेवरील आज सुनावणी झाली. या सुनावणीचे एका रंजक संभाषणात रूपांतर झाले. न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी म्हणाल्या की, मला माझ्या शाळा आजही आठवते. आम्ही सगळे एकत्र उभे राहून प्रार्थना करायचो. दरम्यान, केंद्रीय विद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या आईने प्रार्थना बंद करण्यात यावी, यासाठी याचिका दाखल केली आहे.
न्यायमूर्ती बॅनर्जी म्हणाल्या, आपण शाळेत जी नैतिक मूल्ये घेतो आणि शिकवतो, ती आयुष्यभर आपल्यासोबत राहतात. यावर याचिकाकर्त्याचे वकील कॉलिन गोगोंजाल्विस म्हणाले की, न्यायालयातील आमचा अर्ज एका विशेष प्रार्थनेबद्दल आहे, जी सर्वांसाठी समान असू शकत नाही. प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगळी आहे, पण त्या शाळेत सामूहिक प्रार्थना न म्हटल्यास शिक्षा दिली जाते. यावर न्यायमूर्ती बॅनर्जी यांनी 8 ऑक्टोबरला पुढील सुनावणीची तारीख दिली आहे.
28 जानेवारी 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय विद्यालयात सकाळी होणाऱ्या हिंदी आणि संस्कृत भाषेतील प्रार्थनेविरोधात दाखल जनहित याचिका सुनावणीसाठी मोठ्या खंडपीठाकडे पाठवली होती. या याचिकेवर सुनावणी करताना दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटले होते की, आता मोठे खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करेल. यासोबतच हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोरही ठेवण्यात येणार आहे. केंद्रीय विद्यालयात संस्कृत आणि हिंदीमध्ये प्रार्थना करणे म्हणजे हिंदू धर्माचा प्रसार? यावर सर्वोच्च न्यायालयातील दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी घटनापीठाने करावी, असे म्हटले होते.