जेट एअरवेजच्या विमानास पक्षी धडकला
By admin | Published: December 30, 2014 02:09 AM2014-12-30T02:09:04+5:302014-12-30T02:09:04+5:30
मुंबईहून येत असलेल्या जेट एअरवेजच्या विमानाला पक्षी धडकल्यानंतर त्याच्या डाव्या इंजिनाला आग लागली. त्यामुळे हे विमान आपत्कालीन स्थितीत उतरले. विमानात १२५ प्रवासी आणि सहा कर्मचारी होते.
काठमांडू : मुंबईहून येत असलेल्या जेट एअरवेजच्या विमानाला पक्षी धडकल्यानंतर त्याच्या डाव्या इंजिनाला आग लागली. त्यामुळे हे विमान आपत्कालीन स्थितीत उतरले. विमानात १२५ प्रवासी आणि सहा कर्मचारी होते.
विमान काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुखरूप उतरले, असे ‘जेट एअरवेज’ने सांगितले. हे विमान उतरण्याच्या तयारीत असतानाच त्याला पक्ष्याची धडक बसली. यानंतर त्याच्या एका इंजिनला किरकोळ आग लागली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
विमानतळाचे व्यवस्थापक बीरेंद्र श्रेष्ठ यांनी सांगितले की, उतरण्यापूर्वी विमानाला (फ्लाईट क्रमांक ९ डब्ल्यू २६८) ललितपूरच्या इमादोल भागात पक्षी धडकला. हा पक्षी विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये घुसला. त्यामुळे इंजिनाला आग लागली. विमान काठमांडूतील विमानतळावर उतरल्यानंतर त्याला लगेचच आग लागली.
विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. जेट एअरवेजच्या अभियंत्यांचे पथक विमानाची तपासणी करत आहे. त्यांनी विमानाच्या उड्डाणास धोका नसल्याचे प्रमाणित केल्यानंतर त्याला परत जाण्याची मुभा दिली जाईल, असे श्रेष्ठ यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)