गोमांस खाल्ल्याच्या अफवेने घेतला बळी
By admin | Published: October 1, 2015 12:17 AM2015-10-01T00:17:54+5:302015-10-01T00:17:54+5:30
घरात गोमांस साठवून खाल्ल्याची अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत एका मजुराचा मृत्यू झाला तर त्याचा तरुण मुलगा गंभीर जखमी झाला.
ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश) : घरात गोमांस साठवून खाल्ल्याची अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत एका मजुराचा मृत्यू झाला तर त्याचा तरुण मुलगा गंभीर जखमी झाला. उत्तर प्रदेशातील दादरीमधील बिसरा गावात सोमवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली.
संतप्त जमावाने केलेल्या मारहाणीत ५० वर्षीय मोहम्मद इकलाख ठार झाला असून त्याचा २२ वर्षीय दानिश नावाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर वाढता तणाव लक्षात घेता गावात प्रचंड सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला असून न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी १० लोकांविरुद्ध गुन्हा नोंदविल्यावर सहा जणांना अटक केली. याविरोधात गावकऱ्यांनी आंदोलन केले. गावात तोडफोड,जाळपोळ सुरू केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. या गोळीबारात राहुल यादव नामक गावकरी जखमी झाला.
गौतमबुद्धनगरचे जिल्हाधिकारी एन.पी.सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार इकलाख आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घरात गोमांस साठवून ठेवले असून ते खातही असल्याची अफवा गावात पसरली होती. त्यानंतर २०० लोकांच्या संतप्त जमावाने त्यांच्या घरावर हल्लाबोल केला आणि दगडविटांनी घरातील लोकांना मारहाण सुरूकेली. बेदम मारहाणीत मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या इकलाखचा मृत्यू झाला तर त्याचा तरुण मुलगा गंभीर जखमी झाला असून इस्पितळात मृत्यूशी झुंज देत आहे. इकलाखच्या घरात सापडलेल्या मांसाचे नमुने पोलिसांनी तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले आहेत. परंतु पीडितांनी गोमांस खाल्ले होते की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
(वृत्तसंस्था)