भारतीय मान्सूनचे भाकीत अधिक अचूक असणार
By admin | Published: April 22, 2016 02:58 AM2016-04-22T02:58:52+5:302016-04-22T02:58:52+5:30
भारतात मान्सूनचे आगमन कधी होणार आणि तो निरोप कधी घेणार याचे भाकीत आता पूर्वीच्या पद्धतीपेक्षा अधिक अर्थपूर्णरीत्या करता येणार आहे.
बर्लिन : भारतात मान्सूनचे आगमन कधी होणार आणि तो निरोप कधी घेणार याचे भाकीत आता पूर्वीच्या पद्धतीपेक्षा अधिक अर्थपूर्णरीत्या करता येणार आहे. शास्त्रज्ञांनी ही नवी पद्धत विकसित केली असून, त्यामुळे भारतीय उपखंडातील शेती आणि जलविद्युत प्रकल्पांना पाणीपुरवठ्याचे जास्तीत जास्त चांगले नियोजन करता
येईल.
ही नवी पद्धत विभागीय हवामानाच्या उपलब्ध माहितीच्या विश्लेषणावर आधारित आहे. संशोधक हीच पद्धत भारतीय हवामान विभागानेही अवलंबवावी, असे सांगतील. भारतीय उपखंडातील लोकसंख्येचे भरणपोषण करणाऱ्या लक्षावधी शेतकऱ्यांसाठी उन्हाळ्यात जोरदार पाऊस पडणे खूप महत्त्वाचे आहे. पुढे होणाऱ्या हवामानातील बदलाचा मान्सूनच्या स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो व त्यामुळे नेमके भाकीत हे अधिक प्रासंगिक
ठरेल.
‘भारतीय मान्सून कधी सुरू होणार याचे भाकीत आम्ही दोन आठवडे आणि तो कधी निरोप घेणार याचे भाकीत सहा आठवडे आधी करू शकतो. हे सगळेच जो शेतकरी रोज एकेक दिवस मोजतो आहे त्याच्यासाठी मोठे महत्त्वाचे आहे,’ असे व्हेरोनिका स्टोलबोवा यांनी म्हटले. स्टोलबोवा या जर्मनीतील पोट्सडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट चेंज इम्पॅक्ट रिसर्चने केलेल्या या संशोधनाच्या प्रमुख आहेत.
व्हेरोनिका स्टोलबोवा म्हणाल्या की, ‘उत्तर पाकिस्तान आणि पूर्वघाटात भारतीय महासागराच्या जवळ असलेल्या पहाडी पट्ट्यात तापमान आणि आर्द्रतेतील बदलाचा परिणाम मान्सूनच्या संक्रमणावर महत्त्वाचा म्हणता येईल, असा होणार आहे. (वृत्तसंस्था)
पूर्वापर चालत आलेल्या पद्धतीनुसार मान्सूनच्या आगमनाच्या भाकितासाठी दक्षिण भारताच्या केरळ विभागावरच लक्ष केंद्रित झालेले आहे. भाताच्या लागवडीसाठी पाऊस पडण्याची वेळ अतिशय महत्त्वाची असते. तसेच जलविद्युत प्रकल्पांसाठीही ती महत्त्वाची आहे. भारतीय शेतकऱ्यांना तांदूळ, सोयाबीन, कापसाची लागवड कधी करायची याचा निर्णय घेण्यासाठी मान्सूनची वेळ खूप महत्त्वाची असते. कारण ही पिके साधारणत: जून ते सप्टेंबर या कालावधीतील आहेत.शिवाय मान्सूनचा कालावधी हा जलविद्युत प्रकल्पांतून किती दिवस वीजनिर्मिती करायची याच्या नियोजनासाठीही महत्त्वाचा असतो. कारण धरणे आणि जलसाठे पाण्याने भरलेली असणे गरजेचे असते, असेही त्यांनी सांगितले. संशोधकांनी या पद्धतीची चाचणी आतापर्यंतच्या मान्सूनच्या आकडेवारीशी करून घेतली आहे. या पद्धतीने मान्सूनच्या आगमनाचे भाकीत ७० टक्के, तर त्याच्या निरोपाचे भाकीत ८० टक्के खरे ठरले आहे. हा अभ्यास जिओफिजिकल रिसर्च लेटर्समध्ये प्रसिद्ध झाला आहे.