जमिनीच्या वादातून गर्भवती महिलेच्या पोटात मारल्या लाथा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 03:56 PM2018-02-15T15:56:29+5:302018-02-15T16:05:31+5:30
डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये एका गर्भवती महिलेने आपले बाळ गमावले. मागच्या महिन्यात 28 जानेवारीला जमिनीच्या वादातून सात जण जोसाना सिब्बी यांच्या घरात घुसले.
कोझीकोडे - डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये एका गर्भवती महिलेने आपले बाळ गमावले. मागच्या महिन्यात केरळच्या कोझीकोडेमध्ये ही घटना घडली. केरळ पोलिसांनी या प्रकरणी डाव्या आघाडीच्या सात जणांना अटक केली आहे. त्यात राज्यातील सत्ताधारी सीपीएमच्या स्थानिक नेत्याचा समावेश आहे.
मागच्या महिन्यात 28 जानेवारीला जमिनीच्या वादातून सात जण जोसाना सिब्बी यांच्या घरात घुसले व तिच्या नवऱ्याला मारहाण सुरु केली. जेव्हा तिने हल्लेखोरांना रोखत नवऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी महिलेच्या पोटात लाथा मारल्या. जोसानाच्या शरीरातून रक्तस्त्राव सुरु झाल्यानंतर तिला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांना तिचा गर्भपात करावा लागला. जोसाना चार महिन्यांची गर्भवती होती.
जोसानाला पाचवर्षांचा मुलगाही आहे. शेजाऱ्यांमध्ये जमिनीवरुन वाद होता त्यातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ला होण्याच्या 15 मिनिट आधी तिने फोन करुन पोलिसांकडे मदत मागितली होती. 2 फेब्रुवारीला महिलेच्या कुटुंबियांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. गुन्हा मागे घेण्यासाठी आपल्या कुटुंबावर दबाव टाकण्यात येत असून महिलेला तिच्या नवऱ्याचे पाय कापून टाकू अशी धमकी दिली आहे. आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सीपीएमने म्हटले आहे.