गरोदर महिलांना हज यात्रेत सहभागी होण्यास बंदी
By admin | Published: April 8, 2016 08:32 AM2016-04-08T08:32:33+5:302016-04-08T08:34:00+5:30
केंद्रीय हज समितीने जारी केलेल्या नव्या सुचनेनुसार हज यात्रेमध्ये 4 महिने पुर्ण झालेल्या गरोदर महिलांना सहभागी होता येणार नाही आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
बरेली, दि. ८ - केंद्रीय हज समितीने जारी केलेल्या नव्या सुचनेनुसार हज यात्रेमध्ये 4 महिने पुर्ण झालेल्या गरोदर महिलांना सहभागी होता येणार नाही आहे. हज यात्रा सप्टेंबरपासून सुरु होत असून अर्ज भरतेवेळी महिला गरोदर असेल आणि 4 महिने पुर्ण झाले असतील तर त्या महिलेला सहभागी करण्यात येणार नाही. जर त्या महिलेने ही माहिती लपवण्याचा प्रयत्न केला आणि प्रवासाला सुरुवात केली तरी अर्ध्या प्रवासातून त्या महिलेला विमानातून उतरवून परत पाठवण्यात येईल अशी माहिती हज अधिका-यांनी दिली आहे. मात्र विमानात महिला गरोदर आहेत की नाहीत याची तपासणी कशी केली जाणार आहे? याबद्दल काहीच माहिती देण्यात आलेली नाही.
'हज यात्रा सप्टेंबरपासून सुरु होत असून गरोदर महिलांना परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या गरोदर महिलांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी 4 महिने पुर्ण झालेले नाहीत याची खात्री करुन घ्यावी. नाहीतर त्यांना प्रवासात रोखण्यात येईल', अशी माहिती बरेली हज सेवा समिती सचिन नजीम बेग यांनी दिली आहे. केंद्रीय हज सेवा समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अता-उर-रहमान यांनी हे आदेश दिले असून त्यांनी अगोदरच ज्या महिलांनी पैसे भरले आहेत त्यांना ते परत घेऊन आपल्या सीट्स रद्द करण्यास सांगितलं आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नजीम बेग यांनी दिली आहे. 'पहिले पाच दिवस खुप घाई गडबडीचे असतात. तुम्हाला एका जागेवरुन लगेच दुस-या जागी पोहचायचे असते, तुम्हाला दम लागण्याची शक्यता असते. तसंच पवित्र जागी तुम्हाला फे-या मारायच्या असतात. त्यामुळे गरोदर महिलांच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय घेतल्याचं', नजीम बेग यांनी सांगितलं आहे.
'गरदोर महिलांना जर त्रास होऊ लागला तर हज समितीला सर्व व्यवस्था कराव्या लागतील. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यापासूनचा सर्व खर्च करावा लागले ज्याचा भार समितीवर येईल. त्यामुळेच गरोदर महिलांना वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितलं असल्याचंट', अता-उर-रहमान यांनी सांगितलं आहे. तसंच ही सुचना देशभरातील सर्व केंद्रांना कळवली असून आपापल्या भागातील गरोदर महिला ज्यांनी हज यात्रेसाठी अर्ज केला आहे त्यांना कळवण्यास सांगितलं असल्याची माहिती अता-उर-रहमान यांनी दिली आहे.