शाब्बास पोरा! आई-बापाने कधी शाळा नाही पाहिली; लेकाने अडीच कोटींची स्कॉलरशिप मिळवली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 09:37 AM2022-07-12T09:37:59+5:302022-07-12T09:39:39+5:30
प्रेम कुमारची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. प्रेमचे वडील जीतन मांझी मजुरी करतात. प्रेमने या वर्षी बारावीची परीक्षा दिली.
पाटणा - बिहारमध्ये एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. पाटणा येथील फुलवारी शरीफ येथील गोनपुरा गावात राहणाऱ्या एका 17 वर्षांच्या मुलाने कमाल केली आहे. प्रेम कुमार असं या मुलाचं नाव असून यंदा त्याने बारावीची परीक्षा दिली. प्रेम कुमारचे आई, वडील हे कधीही शाळेत गेलेले नाही, त्यांनी शाळा पाहिलेली नाही. पण लेकाला मात्र आता पुढील शिक्षणासाठी थेट अमेरिकेतील प्रतिष्ठीत महाविद्यालयात शिक्षण्याची संधी मिळाली आहे. अमेरिकेच्या लाफायेट महाविद्यालयाने प्रेमला जवळपास अडीच कोटींची शिष्यवृत्ती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम कुमारची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. प्रेमचे वडील जीतन मांझी मजुरी करतात. प्रेमने या वर्षी बारावीची परीक्षा दिली. लाफायेट महाविद्यालयात प्रेम मॅकेनिकल इंजिनीयरिंगचा अभ्यास करेल. प्रेमच्या शिक्षणाचा आणि अन्य खर्च महाविद्यालय करणार आहे. त्यात ट्युशन, हॉस्टेल, पुस्तकं, आरोग्य विमा यांचा समावेश आहे. प्रेमने वयाच्या 14 व्या वर्षापासून डेक्स्टेरिटी ग्लोबल नावाच्या संस्थेत प्रवेश घेतला.
डेक्स्टेरिटी ग्लोबल एक राष्ट्रीय संघटना आहे. शिक्षणातील संधी आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून देशासाठी आणि जगासाठी नेतृत्त्वाची पुढील पिढी तयार करण्याचं काम ही संघटना करते. प्रेम कुमारने 20 चांगल्या महाविद्यालयांची निवड केली होती. अखेर त्याला यश मिळालं. लाफायेट महाविद्यालयानं त्याला शिष्यवृत्ती देऊ केली. शिक्षण पूर्ण करून देशासाठी काहीतरी करण्याचं स्वप्न प्रेमचं आहे.
पाच बहिणींचा प्रेम हा एकुलता एक भाऊ आहे. प्रेमच्या या यशानंतर एकीकडे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे तर दुसरीकडे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षावही होत आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या यशामागे प्रेमची मेहनत आणि जिद्द आहे. प्रेमला कोणतीही सुविधा नव्हती. त्याचे घरही झोपडीसारखे आहे. आता प्रेम अमेरिकेतील एका मोठ्या कॉलेजमध्ये शिकणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.