कंडक्टरच्या मुलाची कमाल! UP PCS मध्ये सेकेंड टॉपर; आता होणार डेप्युटी कलेक्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 12:00 PM2024-01-24T12:00:24+5:302024-01-24T12:06:30+5:30
प्रेम पांडे हा लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होता. इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण होताच एयरफोर्स सर्जेंट म्हणून नोकरी मिळाली.
उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने PCS 2023 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. जाहीर झालेल्या निकालानुसार, उत्तर प्रदेशच्या देवबंदमध्ये राहणारा सिद्धार्थ गुप्ता हा संपूर्ण राज्यात अव्वल ठरला आहे. त्याचवेळी प्रयागराज येथील प्रेम पांडे हा परीक्षेत दुसरा टॉपर ठरला आहे.
प्रयागराजच्या बेली कॉलनीत राहणारे नारायण पांडे यांच्या कुटुंबाची राज्यात चर्चा रंगली आहे. कंडक्टर असलेल्या नारायण पांडे यांचा मुलगा प्रेम पांडे याने उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या PCS 2023 च्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून आपल्या संपूर्ण कुटुंबाचं नाव मोठं केलं आहे. त्यानंतर त्याचं अभिनंदन करण्यासाठी घरी लोकांची खूप गर्दी झाली होती.
नारायण पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम पांडे हा लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होता. इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण होताच एयरफोर्स सर्जेंट म्हणून नोकरी मिळाली. यावेळी त्याने कानपूर येथील छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठातून बीए आणि एमएचं शिक्षण घेतलं. यानंतर त्याने 2020 मध्ये राजीनामा दिला आणि 2021 मध्ये रिव्ह्यू ऑफिसरच्या भरतीमध्ये निवड झाली.
यूपी पीसीएस परीक्षा उत्तीर्ण होऊन डेप्युटी कलेक्टर होण्याचं प्रेमचं स्वप्न होतं. त्यामुळे त्याने 2022 मध्ये पहिल्यांदा UP PCS ची परीक्षा दिली. तो मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला आणि मुलाखतीलाही बसला पण शेवटी त्याला अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळवता आलं नाही. यानंतर त्याने आपल्या चुका सुधारल्या आणि पुन्हा एकदा यूपी पीसीएस परीक्षेत बसला आणि यावेळी त्याने संपूर्ण राज्यात दुसरा क्रमांक पटकावला.