मोदी सरकारला पुढील महिन्यात 8 वर्षे पूर्ण होणार; भाजपकडून मोठ्या जल्लोषाची तयारी, जाणून घ्या काय आहे प्लॅन?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 05:36 PM2022-04-25T17:36:52+5:302022-04-25T17:38:58+5:30
8th Year Modi Government Prepration for Celebration : मोदी सरकारच्या कार्यकाळाच्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्त अनेक केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत.
नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदीसरकारला पुढील महिन्यात 8 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरात भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यादरम्यान देशभरात लाभार्थी परिषद, युवा परिषद आणि मागासवर्गीयांसाठी परिषदा आयोजित केल्या जाणार आहेत. तसेच, देशातील मंदिरांमध्ये आपआपल्या स्तरावर पूजेचे कार्यक्रम आयोजित केले जातील. याशिवाय, या कार्यक्रमांमध्ये हनुमान चालिसाचे पठणही करण्यात येणार आहे.
मोदी सरकारच्या कार्यकाळाच्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्त अनेक केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत. ही टीम मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्यानंतर होणारे कार्यक्रम ठरवणार आहे. देशभरात कार्यक्रमांसोबतच सरकारच्या योजनाही लोकांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन केले जात आहे. भाजपने सप्ताह बुथ कमिटी टीम तयार केली आहे. या कमिटीमध्ये 4 ते 5 सदस्य असतील, जे देशभरात भाजप कमकुवत असलेल्या बूथवर भाजप मजबूत करण्यासाठी काम करतील.
दरम्यान, आगामी निवडणुकीसाठी कमकुवत बूथ मजबूत करणे हे भाजपचे सर्वात मोठे लक्ष्य आहे. विजयंत पांडा हे भाजपच्या कमकुवत बूथ टीमचे नेतृत्व करत आहेत. या टीममध्ये भाजपचे सरचिटणीस सीटी रवी, लाल सिंग आर्य आणि इतर काही नेत्यांचा समावेश आहे. पक्षाने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांच्या देखरेखीखाली 12 नेत्यांची टीम तयार केली आहे. या संघाने कोणत्या स्तरावर काम करायचे आहे, याचा निर्णय 5 मेपर्यंत केंद्रीय नेतृत्वाकडे सोपविला जाणार आहे. यानंतर मोदी सरकारच्या 8 वर्षांचा उत्सव कसा साजरा करायचा हे ठरवले जाईल.
गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळे उत्सव साजरा झाला नाही
याआधी, मोदी सरकारने गेल्या वर्षी आपल्या कार्यकाळाची 7 वर्षे पूर्ण केली, तेव्हा कोरोनाचा संसर्ग शिगेला पोहोचला होता. त्यामुळेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपशासित राज्यांना सांगितले होते की, कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मोदी सरकारच्या 7 व्या वर्धापन दिनानिमित्त कोणताही मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. अशा कार्यक्रमांऐवजी राज्य सरकारने कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी कल्याणकारी योजना सुरू कराव्यात.