नववर्षी माँ वैष्णोदेवीचं दर्शन सहज घेता येणार; प्रशासनानं आखली खास रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 10:40 IST2022-12-16T10:40:06+5:302022-12-16T10:40:30+5:30
श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्ड आणि प्रशासनाने भाविकांना सहजपणे दर्शन घेता यावे यासाठी पूर्ण व्यवस्था केली आहे

नववर्षी माँ वैष्णोदेवीचं दर्शन सहज घेता येणार; प्रशासनानं आखली खास रणनीती
जम्मू - नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतातील अनेक लोक मंदिरात दर्शनासाठी, पूजेसाठी जात असतात. त्याठिकाणी येणारं वर्ष सुख, समृद्धीचं आणि समाधानाचं जावं अशी प्रार्थना करतात. देशातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक वैष्णो देवी मंदिर. याठिकाणी वर्षभर भाविकांची गर्दी कायम राहते. परंतु नववर्षात इथं प्रमाणापेक्षा जास्त गर्दी होते. मागील वर्षी झालेल्या चेंगराचेंगरीत १४ भाविकांचा मृत्यू झाला होता.
गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आखला प्लॅन
श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्ड आणि प्रशासनाने भाविकांना सहजपणे दर्शन घेता यावे यासाठी पूर्ण व्यवस्था केली आहे. प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बेस शिवीर कटरा आणि मुख्य भवन ६ भागात विभागणी केलीय. प्रत्येक भागात गर्दीवर नियंत्रण करण्याची रणनीती आहे. जेव्हा जेव्हा मुख्य भवनमध्ये गर्दी वाढेल तेव्हा ठिकठिकाणी भाविकांना रोखलं जाईल. यात्रेवर नजर ठेवण्यासाठी ५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत.
२०२२ च्या सुरुवातीला ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीच्या मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत १४ भाविकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत अनेक भाविक जखमी झाले. त्यानंतर पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासन खबरदारी घेताना दिसत आहे. यात शिविर कटरा, बाणगंगा क्षेत्र, ताराकोट मार्ग, भैरव घाटी, माँ वैष्णोदेवी भवन हे प्रमुख भाग असतील. प्रत्येक भागात डिप्टी सीईओ स्तरावरील अधिकारी तैनात राहतील. जे त्यांच्या क्षेत्रातील भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवतील.