Donald Trump's India Visit : अहमदाबादमध्ये ट्रम्प-मोदी करणार 22 किमींचा 'रोड शो'; सामील होणार 50 हजार लोक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 10:07 AM2020-02-15T10:07:53+5:302020-02-15T10:09:06+5:30
Donald Trump's India Visit : गेल्या सप्टेंबरमध्ये ह्युस्टनमधल्या 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात ट्रम्प मोदींबरोबर मंचावर दिसले होते. त्यावेळी मोदींनी ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही भारतात आमंत्रित केलं होतं.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गुजरातची राजधानी अहमदाबाद येथे 24 फेब्रुवारी रोजी तब्बल 22 किमी अंतराचा रोड शो करणार आहे. शहराचे महापौर बिजल पटेल यांनी ही माहिती दिली. या रोड शोमध्ये 50 हजार लोक सामील होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. येत्या 24 व 25 फेब्रुवारीला ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत.
अहमदाबाद येथे आतापर्यंत आलेल्या उच्च पदस्थांमध्ये ट्रम्प यांचा रोड शो सर्वात मोठा ठरणार आहे. ट्रम्प विमानतळावर दाखल झाल्यानंतर सर्वात आधी महत्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमात जाणार आहे. साबरमती आश्रमातून मोदी-ट्रम्प विमानतळाजवळील इंदिरा ब्रीज, एसपी रिंग रोड येथून रोड शोच्या माध्यमातून मोटेरा येथील नव्याने तयार करण्यात आलेल्या मोटेरा स्टेडीयमवर पोहोचणार असल्याचे पटेल यांनी नमूद केले.
पटेल म्हणाले की, अहमदाबादमध्ये 22 किमीचा रोड शो होणार आहे. शहरातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा रोड शो ठरणार आहे. या रोड शोसाठी भाजप कार्यकर्त्यांसह 50 हजारहून अधिक लोक सामील होणार आहेत. 300 संघटना आणि एनजीओचे स्वयंसेवक देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.
गेल्या सप्टेंबरमध्ये ह्युस्टनमधल्या 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात ट्रम्प मोदींबरोबर मंचावर दिसले होते. त्यावेळी मोदींनी ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही भारतात आमंत्रित केलं होतं. त्यावेळीच मोदी म्हणाले होते, ट्रम्प यांचा भारत दौरा दोन्ही देशांच्या स्वप्नांना एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीसुद्धा भारतात येण्याचं निमंत्रण दिलं होतं.