गोव्यात समविचारी पक्षांशी युतीची तयारी - प्रफुल्ल पटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 07:18 AM2020-11-23T07:18:02+5:302020-11-23T07:18:41+5:30

पटेल म्हणाले की, राष्ट्रवादीने अनेकदा काँग्रेसला मदत केली, परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाबाबत झुलवत ठेवल्याने अखेरच्या क्षणाला काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

Preparations for alliance with like-minded parties in Goa - Praful Patel | गोव्यात समविचारी पक्षांशी युतीची तयारी - प्रफुल्ल पटेल

गोव्यात समविचारी पक्षांशी युतीची तयारी - प्रफुल्ल पटेल

googlenewsNext

पणजी : गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससह इतर समविचारी पक्षांशी निवडणूकपूर्व युतीची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा गोवा प्रभारी प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. भाजपच्या पराभवाचे उद्दिष्ट ठेवून विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रवादी सध्याच गोव्यात सात ते आठ जागा स्वबळावर लढवू शकते, असे पटेल म्हणाले. राष्ट्रवादीचे गोवा विधानसभेतील एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांनी काँग्रेसकडे निवडणूकपूर्व युती करायची झाल्यास २० पेक्षा कमी जागा पक्षाने मान्यच करू नये,अशी मागणी पटेल यांच्याकडे केली.

येथील आझाद मैदानावर झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर पत्रकारांशी पटेल यांनी संवाद साधला. त्याआधी मेळाव्यात बोलताना गोव्यात सध्या जे तापलेले विषय आहेत त्या कोळसा प्रदूषण, रेल मार्ग दुपदरीकरण, म्हादई आदी विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेस संघर्षासाठी लोकांबरोबर रस्त्यावर उतरेल, असा इशारा देण्यात आला. पटेल म्हणाले की, गोव्यात राष्ट्रवादीचे काम आणखी वाढविले जाईल. मी प्रभारी म्हणून स्वतः तसेच महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचा किमान एक ज्येष्ठ मंत्री महिन्याला एकदा तरी गोव्यात येईल आणि येथील पक्षाच्या कामाचा आढावा घेईल. २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभूत करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

पटेल म्हणाले की, राष्ट्रवादीने अनेकदा काँग्रेसला मदत केली, परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाबाबत झुलवत ठेवल्याने अखेरच्या क्षणाला काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले की, दिगंबर कामत सरकार कोसळण्याच्या स्थितीत असताना मी आमदारांना खाजगी विमानाने घेऊन दिल्लीला गेलो आणि हे सरकार वाचवले, याची जाणही काँग्रेसने ठेवली नाही. या लोकांनी आम्हाला प्रमाणपत्र देण्याची गरज नाही.' दाबोळी विमानतळ बंद करण्याचे कटकारस्थान शिजले होते. केंद्रात मी विमानोड्डान मंत्री असताना दाबोळी चालूच राहील असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. राष्ट्रवादी पक्ष नेहमीच लोकांबरोबर असेल आणि रस्त्यावरही उतरेल, असे पटेल यांनी सांगितले. सभेला काँग्रेस-राष्ट्रवादीचे निरीक्षक नरेंद्र वर्मा, आमदार चर्चिल आलेमाव, प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा, सरचिटणीस नेली रॉड्रिक्स तसेच राष्ट्रवादीच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

Web Title: Preparations for alliance with like-minded parties in Goa - Praful Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.