‘मन की बात’च्या १०० व्या भागानिमित्त जल्लोषाची तयारी, शंभर रुपयांचे नाणे जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 10:08 AM2023-04-26T10:08:31+5:302023-04-26T10:10:51+5:30
केंद्रीय मंत्री अमित शाह करणार १०० रुपयांचे नाणे जारी
संजय शर्मा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेडिओवर होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे १०० भाग पूर्ण होत असून, यानिमित्त क्रीडा, चित्रपट, पर्यावरण, जल संरक्षण, महिला उत्थानाशी संबंधित विविध क्षेत्रांतील मान्यवर भव्य समारंभात सहभागी होऊन ‘मन की बात’चा देशावर किती परिणाम झाला आहे, हे सांगणार आहेत. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १०० भाग पूर्ण झाल्यानिमित्ताने १०० रुपयांचे विशेष नाणेही जारी करणार आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यानिमित्त विशेष टपाल तिकीट जारी करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ डिसेंबर २०१४ रोजी रेडिओवर सुरू केलेल्या ‘मन की बात’चे १०० भाग ३० एप्रिल रोजी पूर्ण होत आहेत. यानिमित्त दिल्लीच्या नॅशनल मीडिया सेंटरमध्ये केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने ‘मन की बात’वर एक कॉन्क्लेव्ह आयोजित केली आहे. त्याचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड करणार आहेत. महिला शक्ती, वारसा बचाव, जलसंवाद व आवास ते जनआंदोलन, आदी विषयांवर चार सत्रांमध्ये तज्ज्ञांशी खुली चर्चा होणार आहे. या वेळी ‘मन की बात’वर एक कॉफीटेबल बुकचे प्रकाशन अमित शाह यांच्या हस्ते होईल.
एक लाख ठिकाणी कार्यक्रम
या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय मंत्री अमित शाह, अनुराग ठाकूर यांच्याबरोबरच चित्रपट क्षेत्रातून आमिर खान, रविना टंडन उपस्थित राहणार आहेत.
देशाच्या विविध भागांतून १०७ जणांना या कार्यक्रमात बोलावण्यात आले आहे. त्यांच्या नावांचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे १०० भाग पूर्ण होत असल्याबद्दल देशभरात जल्लोष करण्याची तयारी सुरू आहे.
३० एप्रिल रोजी ‘मन की बात’ ऐकण्यासाठी भाजपने देशभरात एक लाख ठिकाणी विशेष आयोजन केले आहे. यात सर्व केंद्रीय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते, सर्व खासदार, आमदार, नेत्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.