Gaganyaan Mission: गगनयान मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात, पुढील वर्षी भारतीय अंतराळवीर जाणार अंतराळात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 11:03 AM2022-07-11T11:03:29+5:302022-07-11T11:05:50+5:30
Gaganyaan Mission: भारताच्या गगनयान मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे. पुढीलवर्षी भारताचे एक किंवा दोन अंतराळवीर अंतराळात जातील, अशी माहिती केंद्रिय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे.
नवी दिल्ली - भारताच्या गगनयान मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे. पुढीलवर्षी भारताचे एक किंवा दोन अंतराळवीर अंतराळात जातील, अशी माहिती केंद्रिय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. दरम्यान, मुख्य मोहिमेआधी या वर्षाच्या आधी दोन चाचण्या घेतल्या जातील. यातील एक चाचणी ही रिकाम्या यानाची असेल. तर दुसऱ्या यानामध्ये एक महिला रोबो आंतराळात पाठवली जाईल. त्याला व्योममित्र असं नाव देण्यात आलं आहे. या दोन्ही मोहिमांच्या आधारावर तिसऱ्या मोहिमेत अंतराळवीर अंतराळात जातील.
याबाबत अधिक माहिती देताना जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, भारत जागतिक पटलावर वेगाने प्रगती करणारा देश बनला आहे. यापूर्वी जून महिन्यामध्ये केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, मानवी मोहिमेची ट्रायल अॅडव्हान्स लेव्हलवर पोहोचली आहे. अंतराळ आणि समुद्र दोन्ही ठिकाणी चाचणी घेतली जात आहे. २०२३ च्या पुढच्या टप्प्यात मोठं यश मिळवू, असा विश्वास जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी ३० जून रोजी इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले होते की, महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेंतर्गत देशातील पहिली मानवी मोहीम या वर्षी किंवा पुढच्या वर्षी होणं शक्य नाही. कारण या मोहिमेपूर्वी संस्था सुरक्षेबाबत संपूर्ण खातरजमा करून घेईल. ही एक महत्त्वपूर्ण मोहिम आहे. तसेच जेव्हा मानवाला अंतराळात पाठवले जाते. तेव्हा खूप खबरदारी घ्यावी लागते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने वारंवार परीक्षणे केली जात आहेत. आपण खूप सावधपणे पुढे गेलं पाहिजे, असे त्यांनी सांगितले होते.