बापरे! घरात सुरू होती तेराव्याची तयारी अन् अचानक एक दिवस आधी परतला मृत्यू झालेला तरुण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 08:58 PM2022-09-17T20:58:47+5:302022-09-17T21:05:44+5:30
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या तरुणाने घर सोडले. त्याचा मृत्यू झाल्याची बातमी त्याच्या कुटुंबीयांनीही नातेवाईक आणि समाजामध्ये पसरवली.
अभिनेता शाहिद कपूरचा 'चुप चुप के' हा चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल. या चित्रपटात, कर्जबाजारी झालेला जीतू (शाहिद कपूर) आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे वडिलांना विम्याच्या पैशाने सर्व कर्ज फेडता यावेत असा जीतूचा उद्देश असतो. हा विचार करून तो नदीत उडी घेतो. बराच शोध घेऊनही त्याचा मृतदेह सापडत नाही. अशी चित्रपटातील कथा आहे. मात्र आता खऱ्या आयुष्यातही अशीच एक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये हा प्रकार पाहायला मिळाला आहे.
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या तरुणाने घर सोडले. त्याचा मृत्यू झाल्याची बातमी त्याच्या कुटुंबीयांनीही नातेवाईक आणि समाजामध्ये पसरवली. मात्र, तेराव्याच्या एक दिवस आधी तो जिवंत परतला तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. बिजनौरमधील हलदौर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जगनवाला गावात ही घटना घडली आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तरुणावर गावकऱ्यांचे सुमारे तीन लाख रुपयांचे कर्ज होते.
कमल सिंह यांनी सांगितले की, सहा सप्टेंबर रोजी तरुणाच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. विशिष्ट प्रकारचा किटक चावल्याने या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याचा मृतदेह गंगेत सोडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी मृत घोषित करण्यात आलेल्या तरुणाच्या तेराव्याचे विधी होणार होते. घरी त्याची तयारी देखील सुरू करण्यात आली.
मृत घोषित केलेला तरुण बुधवारी रात्री तेराव्याच्या एक दिवस आधी गावात परतल्यावर या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले. गुरुवारी सकाळी या तरुणाला जिवंत पाहून ग्रामस्थ हादरले. याबाबत तरुण व त्याच्या कुटुंबीयांशी तरुण कामानिमित्त बाहेर गेला होता असे सांगितले. आता पोलीस या तरुणाच्या मृत्यू हे ढोंग होते का, याची चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.