राम मंदिर भूमिपूजनाची अयोध्येत जय्यत तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 06:38 AM2020-08-01T06:38:57+5:302020-08-01T06:39:02+5:30
सुरक्षा व्यवस्थेचाही प्रशासनाने घेतला आढावा
त्रियुग नारायण तिवारी/ सुमन गुप्ता।
लोकमत न्यूज नेटवर्क
अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाची जय्यत तयारी केली जात आहे. कार्यक्रमासाठी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात येत असून वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करीत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपमुख्यमंत्र्यांसमवेत तयारीचा आढावा घेण्यासाठी पुन्हा एकदा अयोध्येला भेट देण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत अयोध्येत कोरोनाचे १४२ नवीन रुग्ण आढळले आहेत. जिल्हाधिकारी अनुज झा यांनी कार्यक्रमाच्या तयारीत सामील असलेल्या दोनशे जणांची कोरोना निदान चाचणी करून घेतली.
घाटाचा संपूर्ण परिसर स्वच्छ केला असून या परिसरात आकर्षक रंगरंगोटी केली जात आहे. मूळ रहिवासी व पत्रकारांना ओळखपत्रावर अयोध्येत प्रवेश दिला जात आहे. बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही. मुख्य सचिव आर.के. तिवारी, पोलीस महानिरीक्षक एच. सी. अवस्थी, प्रधान गृह सचिव अवनीश अवस्थी आदी वरिष्ठांनी दौरा करून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, कोरोनामुळे अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भूमिपूजन सोहळ्याला निमंत्रित करण्यात आलेले नाही.
शरयू नदीलगत साफसफाई
तयारीचा भाग म्हणून शरयू नदीलगत परिसरात साफसफाई करण्यात येत आहे. चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात येत असल्याने शरयूच्या काठावर स्नानासाठी उभारण्यात आलेल्या घाटांवर नेहमीसारखी वर्दळ दिसत नाही. पुरोहितांची लगबग नाही. घाटांवर फूलमाळा, पूजेचे साहित्य विकणाऱ्यांची दुकानेही दिसत नाहीत. घाटांवरील मंडपही हटविले आहेत.