दिल्ली विधानसभेनंतर महापालिकेत आपला धक्का देण्याची तयारी, तीन नगरसेवक भाजपात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 14:57 IST2025-02-15T14:56:24+5:302025-02-15T14:57:04+5:30
Delhi BJP News: नुकत्यात झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवत भाजपाने तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीची सत्ता मिळवली होती. लोकसभेत पैकीच्या पैकी जागा आणि विधानसभेत विजय मिळवल्यानंतर आता भाजपाने दिल्ली महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

दिल्ली विधानसभेनंतर महापालिकेत आपला धक्का देण्याची तयारी, तीन नगरसेवक भाजपात दाखल
नुकत्यात झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवत भाजपाने तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीची सत्ता मिळवली होती. लोकसभेत पैकीच्या पैकी जागा आणि विधानसभेत विजय मिळवल्यानंतर आता भाजपाने दिल्ली महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दिल्लीतील पराभवानंतर हादरलेल्या आम आदमी पक्षातील तीन नगरसेवकांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी या तिघांनाही भाजाचं सदस्यत्व दिलं.
आज भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये अँड्र्यजगंजच्या नगरसेविक अनिता बसोया, आर.के. पुरमचे नगरसेवक धर्मवीर आणि चपराना वॉर्ड क्र. १५२ चे नगरसेवक निखिल यांचा समावेश आहे. दिल्ली विधानसभेनंतर आता दिल्लीतील महानगरपालिकेमध्ये कमळ फुलवण्याचा भाजपाचा इरादा आहे.
याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये दिल्ली महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आथा महापौर निवडणुकीतही भाजपाचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ७० पैकी ४८ जागा जिंकल्या होत्या. तर आम आदमी पक्षाला केवळ २२ जागांवर समाधान मानावं लागलं होतं.
दरम्यान, दिल्लीतील महापौरपदाची मागची निवडणूक २०२४ मध्ये झाली होती. मात्र त्या महापौरांचा कार्यकाल केवळ ५ महिन्यांचा होता. त्यावेळी आपच्या महेश खिंची यांनी भाजपाच्या किशन लाल यांचा केवळ ३ मतांनी पराभव केला होता. त्या महापौर निवडणुकीत एकूण २६३ मतं पडली होती. त्यापैकी आपच्या महेश खिंची यांना १३३ तर भाजपाच्या किशनलाल यांना १३० मतं मिळाली होती. तर २ मतं बाद झाली होती.