मोदी सरकारचा वटहुकूम हाणून पाडण्याची तयारी; केजरीवाल ठाकरे, तर गुरुवारी पवारांना भेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 05:57 AM2023-05-23T05:57:52+5:302023-05-23T05:58:22+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेला निकाल पलटविण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने काढलेल्या वटहुकुमाचा विरोध म्हणजे पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होणाऱ्या विरोधी पक्षांची ऐक्याची उपांत्य फेरी ठरणार असल्याचे आम आदमी पार्टीचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :केंद्रातील भाजप सरकारच्या हुकूमशाही स्वरूपाच्या वटहुकुमाला विरोधी पक्षांनी एकजूट होऊन संसदेत पराभूत करावे म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व विरोधी पक्षनेत्यांच्या भेटीगाठी घेण्याचा कार्यक्रम आखला आहे. केजरीवाल उद्या, बुधवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटणार आहेत. तत्पूर्वी केजरीवाल आज, मंगळवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेला निकाल पलटविण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने काढलेल्या वटहुकुमाचा विरोध म्हणजे पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होणाऱ्या विरोधी पक्षांची ऐक्याची उपांत्य फेरी ठरणार असल्याचे आम आदमी पार्टीचे म्हणणे आहे. ‘आप’चे खासदार संजय सिंह, संदीप पाठक, दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांनी सोमवारी एका संयुक्त पत्रकार परिषदेत ‘आप’च्या रणनीतीची माहिती दिली.
रविवारी केजरीवाल यांच्या निवासस्थानी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भेट घेतली. दिल्लीत सुरू असलेल्या केंद्र सरकारच्या हुकूमशाहीसह अनेक राजकीय मुद्द्यांवर नितीशकुमार आणि यादव यांच्याशी चर्चा झाल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
केंद्रातील मोदी सरकारने काढलेल्या या वटहुकुमावर संसदेत मोदी सरकारचे पुरेसे संख्याबळ नसलेल्या राज्यसभेने शिक्कामोर्तब करू नये म्हणून केजरीवाल यांनी सर्व विरोधी पक्षनेत्यांशी संपर्क साधण्याची मोहीम हाती घेतली आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निष्प्रभ करणारा वटहुकूम काढण्यापूर्वी मोदी सरकारने राज्यसभेत संख्याबळाची व्यवस्था करण्यासाठी बिजू जनता दल आणि वायएसआर काँग्रेसशी संपर्क साधला असल्याची चर्चा आहे.