निवडणुकीच्या धामधुमीदरम्यान चांद्रयान-2 चंद्राकडे झेपावणार, इस्रोकडून तयारी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 12:21 PM2019-03-29T12:21:48+5:302019-03-29T12:22:24+5:30
एकीकडे देशात निवडणुकीची धामधूम सुरू असताना तिकडे इस्रोने महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 प्रकल्पावर अंतिम हात फिरवण्यास सुरुवात केली असून, पुढच्या महिन्यात हे यान चंद्राच्या दिशेने झेपावण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीमुळे सध्या देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे देशात निवडणुकीची धामधूम सुरू असताना तिकडे इस्रोने महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 प्रकल्पावर अंतिम हात फिरवण्यास सुरुवात केली असून, पुढच्या महिन्यात हे यान चंद्राच्या दिशेने झेपावण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून इस्रोकडूनचांद्रयान-2 मोहिमेची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र या यानाचे प्रक्षेपण काही तांत्रिक कारणांमुळे दोन वेळा लांबणीवर पडले होते.
2017 आणि 2018 मध्ये चांद्रयान-2 चे प्रक्षेपण करण्याची घोषणा इस्रोने केली होती. मात्र ते शक्य होऊ शकले नव्हते. काही चाचण्या पूर्ण न झाल्याने चांद्रयान-2 चे प्रक्षेपण लांबणीवर पडले होते. भारताने याआधी प्रक्षेपित केलेल्या चांद्रयान-1 सोबत रोव्हर आणि लँडर नव्हते. मात्र यावेळी रोव्हर आणि लँडरचा मोहिमेत समावेश करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात चांद्रयान-2 चे प्रक्षेपण करता यावे यासाठी इस्रो प्रयत्नशील आहे. मात्र ते शक्य न झाल्यास जून महिन्यात चांद्रयानाचे प्रक्षेपण केले जाईल. त्यासाठी सातत्याने चाचण्या घेतल्या जात आहेत, अशी माहिती इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवान यांनी दिली.
ही आहेत चांद्रयान-2 ची वैशिष्ट्ये
चांद्रयान-2 चे एकूण वजन 3 हजार 290 किलो आहे. चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यावर याचे ऑर्बिटर आणि लँडर वेगळे होतील. त्यानंतर लँडर चंद्राच्या पृष्टभागावर उतरेल. त्यानंतर रोव्हर त्यापासून वेगळा होईल. चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरमध्ये अनेक संवेदनशील उपकरणे, कॅमेरे आणि सेंसरस्चा सामावे आहे. तसेच रोव्हरवरसुद्धा अनेक अत्याधुनिक उपकरणे लावण्यात आलेली आहेत. ही दोन्ही उपकरणे चंद्राच्या पृष्टभागावर सापडणारी खनिजे आणि अन्य पदार्थांबाबतची माहिती पाठवतील. त्यानंतर इस्रो त्यावर अधिक संशोधन करणार आहे.
चांद्रयानाचा लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात येणार आहे. त्यासाठी दोन जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एका जागेवर लवकरच शिक्कामोर्तब करण्यात येईल. विशेष बाब म्हणजे यापैकी कुठल्याही जागी याआधी कुठल्याही देशाने लँडर उतरवलेले नाही. येथील जमीन काहीशी सपाट असल्याने रोव्हरची हालचाल करण्यात फारसे कष्ट पडणार नाहीत. तसेच रोव्हरला ऊर्जेची कमतरता पडू नये यासाठी त्याला सौर उपकरणे लावण्यात आली आहेत. याआधी 2008 मध्ये भारताने चांद्रयान 1 चे प्रक्षेपण केले होते. इंधनाच्या कमतरतेमुळे ही मोहीम 2009 मध्ये संपुष्टात आली होती.