विधानसभा बरखास्त करण्याचा ड्राफ्ट तयार
By admin | Published: October 26, 2016 06:13 AM2016-10-26T06:13:28+5:302016-10-26T06:13:28+5:30
समाजवादी पार्टी आणि यादव घराण्यातील समेटाचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा ड्राफ्ट तयार केला
- मीना कमल, लखनौ
समाजवादी पार्टी आणि यादव घराण्यातील समेटाचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा ड्राफ्ट तयार केला आहे, असे सांगण्यात येते. मुलायमसिंग यादव आणि शिवपाल यादव यांनी आपणास हटवण्याचा प्रयत्न केल्यास अखिलेश विधानसभा बरखास्तीची शिफारस करतील, असे दिसते.
ड्राफ्टच्या कायदेशीर तपशिलाबाबत मुख्यमंत्र्यांनी आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांशी तसेच विधी विभागातील जाणकारांशी विचारविनिमय केल्याचेही समजते. अखिलेशच मुख्यमंत्री राहतील आणि हकालपट्टी झालेल्या मंत्र्यांना परत घेण्याबाबत तेच निर्णय घेतील, असे मुलायमसिंग म्हणाले आहेत.
सपातील यादवी संपवण्याचा प्रयत्न करताना मुलायमसिंग यांनी विरोधकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर अखिलेश यांनी नवे हत्यार उपसत विधानसभा बरखास्त करण्याची तयारी सुरू केली. गरज पडल्यास याही अस्त्राचा वापर केला जाऊ शकतो. हकालपट्टी केलेल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात घेण्यास अखिलेश यांचा विरोध आहे. पण तसा दबाव आल्यास अखिलेश हे विधानसभा बरखास्तीची शिफारस करू शकतात. यामुळे मंत्रिमंडळही राहणार नाही आणि मंत्र्यांना पुन्हा सामील करून घेण्याचा दबावही राहणार नाही, असे त्यांना वाटते.
सोमवारी रात्री अखिलेश यांनी
अचानक पक्षाच्या आमदारांची तातडीची बैठक बोलावली होती. त्याचबरोबर आपल्या मर्जीतले अधिकारी व विधी विभागातील अधिकाऱ्यांशीही त्यांनी विचारविनिमय केला.
योग्य वेळेची वाट पाहण्याचीही तयारी
अखिलेश यांनी विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस केली, तर चेंडू राज्यपालांच्या कोर्टात जाईल व त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली, तर सारेच मुसळ केरात जाईल, अशीही त्यांना भीती वाटते आहे.
या सर्व शक्याशक्यतांच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यांनी मर्जीतील लोकांशी विधानसभा बरखास्त करण्याच्या शिफारशीच्या ड्राफ्टबाबत चर्चा केली. तथापि, बरखास्तीचे पत्र राज्यपालांकडे कधी सुपुर्द करायचे, यासाठी योग्य वेळेची वाट पाहण्याचीही तयारी आहे.