येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 08:19 AM2024-05-26T08:19:37+5:302024-05-26T08:20:01+5:30
"इंडिया आघाडीचे ‘अपना काम बनता, भाड में जाए जनता’ हे एकच सूत्र"
एस. पी. सिन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५० दिवसांतील नवव्या बिहार दौऱ्यात पाटणा, बस्कर आणि काराकाट मतदारसंघांतील रालोआ उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतल्या. पाटण्यातील बिक्रम येथे भाजप उमेदवार रामकृपाल यादव यांच्या प्रचारसभेला संबोधित करताना त्यांनी राजद व काँग्रेसवर घणाघाती टीका केली. येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा. या लाडूत मोठे सामर्थ्य असते, असे ते म्हणाले. इंडिया आघाडीचे ‘अपना काम बनता, भाड में जाए जनता’ हे एकच सूत्र आहे, असा घणाघात त्यांनी केला.
बिहारमध्ये लोक कंदील घेऊन फिरत आहेत. परंतु, हा कंदील केवळ एकच घर उजळवतो. आजच्या एलईडी बल्बच्या जमान्यात बिहारमध्ये एक कंदील असा आहे जो केवळ एकाच घराला प्रकाशमान करतो. या कंदिलाने बिहारमध्ये केवळ अंधारच पसरवला आहे, अशा शब्दांत मोदींनी लालू यादव यांच्या राजवटीवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधानांनी जनसमुदायाशी संवाद साधत विचारले की, भारताला कसा पंतप्रधान हवा आहे? दमदार.. देशाचे सामर्थ्य जगासमोर भक्कमपणे मांडू शकेल असा पंतप्रधान पाहिजे... दुसरीकडे इंडिया आघाडीवाले आहेत. त्यांची पाच वर्षांत पाच पंतप्रधान देण्याची योजना आहे. अशा स्थितीत देशाचे काय होईल? असा प्रश्न मोदी यांनी यावेळी उपस्थित केला.