समान नागरी कायद्यावरील जाहीर चर्चेस काँग्रेस तयार
By admin | Published: July 15, 2016 02:33 AM2016-07-15T02:33:11+5:302016-07-15T02:33:11+5:30
समान नागरी कायदा विधेयकाच्या मसुद्यावर जाहीर सुनावणी व सर्वपक्षीय बैठक घेण्यास अनुकूलता दर्शवितानाच काँग्रेस पक्षाने सर्वांचे एकमत झाले तरच या मुद्द्यावर पुढे जाता येऊ शकेल
हैदराबाद : समान नागरी कायदा विधेयकाच्या मसुद्यावर जाहीर सुनावणी व सर्वपक्षीय बैठक घेण्यास अनुकूलता दर्शवितानाच काँग्रेस पक्षाने सर्वांचे एकमत झाले तरच या मुद्द्यावर पुढे जाता येऊ शकेल, असेही स्पष्ट केले आहे.
वरिष्ठ काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग येथे गुरुवारी म्हणाले की, भारतासारख्या बहुवांशिक आणि बहुधर्मीय देशात समान नागरी कायदा लागू करणे सोपे नाही. भारतात अनेक जाती, विविध धर्म आणि पंथ आहेत. हिंदूंमध्येही विवाहाच्या व अंत्यसंस्काराच्या अनेक प्रकारच्या प्रथा आहेत. त्यामुळे हे सोपे नाही.
दिग्विजयसिंह म्हणाले की, भारत सरकारने विधि आयोगाला या मुद्द्यात लक्ष घालण्यास सांगितले आहे. त्यामुळे विधि आयोगाने जाहीर सुनावणी घेऊन त्याबाबत सर्व समूहांची मते जाणून घ्यावीत. विधि आयोगाने याबाबत मसुदा तयार केल्यानंतर त्यावर सर्वपक्षीय बैठक घ्यावी. (वृत्तसंस्था)