कोरोनालढ्यासाठी सज्ज राहा, केंद्राचे सतर्कतेचे आदेश; परदेशातून आलेले १५ जण पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 05:54 AM2022-12-27T05:54:17+5:302022-12-27T05:54:50+5:30

देशात म्यानमार आणि थायलंडमधून आलेले तब्बल १५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह निघाले. 

prepared for corona fight central govt vigilance order 15 people from abroad are positive | कोरोनालढ्यासाठी सज्ज राहा, केंद्राचे सतर्कतेचे आदेश; परदेशातून आलेले १५ जण पॉझिटिव्ह

कोरोनालढ्यासाठी सज्ज राहा, केंद्राचे सतर्कतेचे आदेश; परदेशातून आलेले १५ जण पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : चीनसह अनेक देशांमध्ये कोरोना अनियंत्रित झाल्यानंतर भारतातही तो परदेशी प्रवाशांच्या मार्गाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. देशात सोमवारी म्यानमार आणि थायलंडमधून आलेले तब्बल १५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह निघाले. 

दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी १०० डॉक्टर आणि भारतीय वैद्यकीय संघटनेच्या (आयएमए) सदस्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे संवाद साधल्यानंतर मंगळवारी देशभरातील सर्व कोविड रग्णालयांत ‘मॉक ड्रिल’ करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

बिहारच्या गया विमानतळावर थायलंडमधील ९, म्यानमारमधील एक आणि इंग्लंडमधील एका प्रवाशाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निघाला आहे. त्याचवेळी दिल्ली विमानतळावर म्यानमारमधील ४ परदेशी नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सर्व नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. 
गया येथे तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले ११ परदेशी नागरिक कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांना हॉटेलमध्येच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

बूस्टर डोस घेण्याचे आवाहन

कोविडची सद्यस्थिती, लसीकरण कार्यक्रम व सरकारी प्रयत्नांबाबत नागरिकांना जागरूक करून कोरोनाची भीती कमी करण्यावर डॉ. मांडविया यांनी भर दिला. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोविडच्या पंचसूत्रीचा अवलंब करण्याचा व बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले.

श्वसनाचे रुग्ण वाढल्यास सतर्क राहा

काही भागांत कोविडशी संबंधित रुग्णालयात भरती किंवा श्वसनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली, तर सतर्क राहा, रुग्णालयांनी त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे, असा अलर्ट राज्यांना देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

देशात ३४२८ सक्रिय रुग्ण

देशात मागील २४ तासांत १९६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ३४२८ वर पोहोचली आहे. केरळमधील २ मृत्यूंसह मृतांची एकूण संख्या ५,३०,६९५ आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: prepared for corona fight central govt vigilance order 15 people from abroad are positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.