2024 ची तयारी! देशभरात भाजपा मुस्लिमांना 'मोदी मित्र' बनविणार, ईदनंतर दिलेय 'टार्गेट'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 12:50 PM2023-03-16T12:50:25+5:302023-03-16T12:50:53+5:30
मुस्लिमांना मोदी मित्र बनविण्यासाठी रणनीति बनविण्यात आली आहे. यामध्ये सर्व स्तरातील मुस्लिमांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने मुस्लिमांना आकर्षित करण्याची मोठी योजना आखली आहे. यासाठी देशातील मुस्लिम बहुल लोकसभा मतदारसंघांत मुस्लिमांना मोदी मित्र बनविण्याचे टार्गेट ठेवले आहे. ईदनंतर भाजपाचा अल्पसंख्यांक मोर्चा या मोहिमेला सुरुवात करणार आहे.
अल्पसंख्यांक मोर्चाचे दिल्ली प्रदेश प्रभारी आतिफ रशीद यांनी याची आजतकला माहिती दिली आहे. देशभरातील मुस्लिमांना भाजपाशी जोडण्यासाठी जनसंपर्क अभियान सुरु केले जाणार आहे. 'गाव-गाव घर-घर' चलो अभियान सुरु केले जाणार आहे. यानुसार घरोघरी जाऊन मोदी सरकारच्या योजना, नीती आणि कामे याबाबत माहिती दिली जाणार आहे.
मुस्लिमांना मोदी मित्र बनविण्यासाठी रणनीति बनविण्यात आली आहे. यामध्ये सर्व स्तरातील मुस्लिमांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. यासाठी विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ विचारात घेण्यात आले आहेत. अशा ठिकाणी ५ ते १० हजार असे लोक असे आहेत जे कोणत्याही पक्षाशी संबंधीत नाहीत परंतू मोदींच्या कामावर खूश आहेत. असे मतदारसंघ निवडले आहेत जिथे मुस्लिमांची लोकसंख्या ३० टक्क्यांहून अधिक आहे.
विविध राज्यांमध्ये ६५ असे मतदारसंघ आहेत. यामधील ५००० मुस्लिमांना शोधले जाणार आहे. हे लोक भाजपचे नसतील. हे लोक इनफ्लुएंसर्सची भूमिका निभावू शकतील, असे रशीद म्हणाले. देशभरातील लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी 80 जागा अशा आहेत जिथे मुस्लिम लोकसंख्या 20 टक्क्यांहून अधिक आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 20 टक्क्यांपेक्षा जास्त मतांसह 80 पैकी 58 जागा जिंकल्या होत्या. 17व्या लोकसभेत 27 जागांवर मुस्लिम खासदार निवडून आले होते. ही संख्याच भाजपाला बहुमताकडे नेत आहे.