भाजपकडून २०२४ची जय्यत तयारी! ज्यांना मंत्रिपदाची लॉटरी त्यांना दिल्लीत बोलावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 09:53 AM2023-07-09T09:53:42+5:302023-07-09T09:54:28+5:30
पंतप्रधान चार दिवस दिल्लीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून पुढील चार दिवस दिल्लीतच आहेत
संजय शर्मा
नवी दिल्ली - सलग तिसऱ्यांदा २०२४ मध्ये केंद्रात सरकार स्थापन करण्याच्या तयारीसाठी भाजपाने देशभरातील सर्व राज्यांच्या संघटनेशी मॅरेथॉन चर्चेच्या फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. आता सर्वांच्या नजरा केंद्रीय मंत्रिमंडळात होणाऱ्या फेरबदलाकडे लागलेल्या आहेत. २०२४ च्या लोकसभा व नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांबाबत २८ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या बैठकीत चर्चा झाली होती. तेव्हाच केंद्र सरकार व भाजपमधील बदलांबाबत चर्चा सुरू झाली.
आजही भाजपच्या सर्व राष्ट्रीय मोर्चांची दिल्लीत बैठक बोलावण्यात आली होती. तसेच दक्षिण भारतातील राज्यांची बैठक तेलंगणाच्या हैदराबादेत बोलावली होती. मागील एक आठवड्यापासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे. पी. नड्डा आणि राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. भाजपच्या ज्या नेत्यांना मंत्री केले जाणार आहे, त्यांना शपथविधीपूर्वी जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी एकेक करून बोलावले जाणार आहे, अशी चर्चा आहे.
पंतप्रधान चार दिवस दिल्लीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून पुढील चार दिवस दिल्लीतच आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्ली बाहेरील कार्यक्रमांतही बदल करण्यात आलेला आहे. म्हणजेच पुढील काही दिवसांत मोदी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.