‘डिस्टन्सिंग’चे नियम पाळून पावसाळी अधिवेशन घेण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 11:30 PM2020-07-21T23:30:23+5:302020-07-22T06:41:58+5:30
लोकसभा व राज्यसभेच्या बैठका स्वतंत्रपणे घेण्याचा प्रस्ताव
नवी दिल्ली : संसदेचे आगामी पावसाळी अधिवेशन भरविताना ‘सोशल डिन्स्टन्सिंग’चे पालन करता यावे यासाठी लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांच्या बैठका एकाच वेळी न घेता स्वतंत्रपणे घेण्याचा नवा पर्याय पुढे आला आहे. यासाठीची तयारी पूर्ण करून अशा प्रकारे संसदेचे अधिवेशन आॅगस्टअखेर किंवा सप्टेंबरमध्ये घेणे शक्य होईल, असे सूत्रांनी सांगितले.
याच नव्या प्रस्तावाचा विचार करण्यासाठी राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू व लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची सोमवारी बैठक झाली. नंतर दोघांनी दोन्ही सभागृहांची दालने व गॅलऱ्यांची पाहणी करून ‘सोश्ल डिस्टन्सिंग’च्या नियमांचे पालन करून तेथे सदस्यांची आसनव्यवस्था कशी करता येईल, याचा आढावा घेतला. दोन्ही सभागृहांच्या बैठका नेहमीप्रमाणे एकाच वेळी त्यांच्या ठरलेल्या दालनात घ्यायच्या म्हटले तर तेथे सर्व सदस्यांची ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळून आसनव्यवस्था होणे शक्य नाही.
अधिवेशन सुरू असताना दोन्ही सभागहांच्या बैठका एकाच वेळी घेणे नियमांनुसार बंधनकारक नाही. त्यामुळे दोन्ही सभागृहांच्या बैठका निरनिराळ्या वेळेला आयोजित केल्या तर ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळूनही तसे करणे शक्य होईल. त्यानुसार लोकसभेची बैठक सुरू असताना तेथील सदस्यांची आसनव्यवस्था लोकसभा व राज्यसभा या दोन्हींच्या दालतान व गॅलऱ्यांमध्ये करायची व राज्यसभेची बैठकही अशाच प्रकारे स्वतंत्रपणे घ्यायची, असा हा प्रस्ताव आहे.
बरीच तयारी करावी लागेल
अशा प्रकारे अधिवेशन भरविण्यासाठी बरीच तयारी करावी लागेल. त्यात जे सदस्य गॅलºयांमध्ये व दुसºया सभागृहाच्या दालनात बसतील त्यांना तेथून कामकाज दिसण्याची व त्यात सहभागी होण्याची आॅडिओ-व्हिडिओ व्यवस्था करणे, सुरू असलेल्या भाषणांच्या लगेचच्या लगेच दुभाष्यांमार्फत भाषांतराची सोय करणे, दोन-तीन ठिकाणी मिळून होणाºया बैठकीतील कामकाजाचे एकसंध थेट प्रक्षेपण करणे व मतदान घेण्याची वेळ आल्यास सदस्यांना ते जेथे बसले असतील तेथूनच मतदान करता येईल, अशी व्यवस्था करणे इत्यादींचा समावेश असेल.
राज्यसभा सचिवालयाने आधी फक्त आपल्या सभागृहाची अशा प्रकारे बैठक घेण्याचा विचार केला होता. त्यात बैठकीच्या वेळी सदस्यांना राज्यसभेच्या नेहमीच्या दालनाखेरीज सेंट्रल हॉल व बालयोगी सभागृहात विखरून बसविण्याची योजना होती.