‘शुक्र मिशन’ची तयारी सुरू
By admin | Published: April 25, 2017 12:52 AM2017-04-25T00:52:31+5:302017-04-25T00:52:31+5:30
आपल्या ग्रहमालेतील ‘शुक्र’ या ग्रहाची रहस्ये उलगडण्यासाठी भारताने तेथे यान पाठविण्याची योजना अद्याप प्राथमिक
थिरुवनंतपूरम : आपल्या ग्रहमालेतील ‘शुक्र’ या ग्रहाची रहस्ये उलगडण्यासाठी भारताने तेथे यान पाठविण्याची योजना अद्याप प्राथमिक स्तरावर असली तरी भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) याची जय्यत तयारी सुरु केली असून ‘व्हिनस मिशन’मध्ये कोणते वैज्ञानिक प्रयोग करावेत याविषयीचे प्रस्ताव पाठविण्याचे देशभरातील वैज्ञानिकांना आवाहन केले आहे.
‘इस्रो’ने त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध केलेल्या माहितीनुसार ‘शुक्र’ ग्रहाच्या दिशेने पाठवायच्या उपग्रहाचे वजन अंदाजे १७५ किग्रॅ एवढे असण्याची अपेक्षा असून त्यावर ५०० वॉट वीज उपलब्ध असेल. हा उपग्रह ५०० बाय ६० हजार किमी अंतराच्या लंबवर्तुळाकार कक्षेतून ‘शुक्रा’भोवती घिरट्या घालेल. काही महिन्यांनी ही कक्षा कमी होईल.
हे यान ‘शुक्रा’भोवती प्रदक्षिणा करीत असताना कोणते प्रयोग केले जाऊ शकतील याची संकल्पना वैज्ञानिकांना तयार करता यावी यासाठी ‘इस्रो’ने ही प्राथमिक माहिती प्रसृत केली आहे. शुक्र ग्रहाच्या वातावरमाणाचा व पृष्ठभागाचा अभ्यास, सूर्य व शुक्राचे परस्पर संबंध, प्राणीशास्त्रीय प्रयोग आणि नव्या तंत्रज्ञानाची तपासणी व सिद्धता यावर या मिशनमध्ये भर असेल व त्यादृष्टीने वैज्ञानिकांनी करायचे वैज्ञानिक प्रयोग सुचवावेत, अशी अपेक्षा आहे.
‘इस्रो’च्या अधिकाऱ्याने सांगितले की, या मिशनला सरकारकडून मंजुरी मिळाली असून संसदेने संमत केलेल्या लेखानुदानातही याचा उल्लेख आहे. मात्र या मिशनचा नक्की कार्यक्रम अद्याप ठरलेला नाही. ‘इस्रो’ म्हणते की, आकार, वस्तुमान, घनता व गुरुत्वाकर्षण इत्यादींच्या बाबतीत बरेच साम्य असल्याने शुक्र हे पृथ्वीची जुळे भावंड मानले जाते. सुमारे ४.५ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वी व शुक्र या दोन्ही ग्रहांची निर्मिती एकाच वेळी झाली असावे, असे वैज्ञानिकांना वाटते. (वृत्तसंस्था)