टेन्शन नॉट! निवांत राहा, तुझी निवड निश्चित; खान सर बोलले अन् तसंच झालं, पोरीनं मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 03:40 PM2024-01-17T15:40:31+5:302024-01-17T15:55:43+5:30
खान सर हे प्रसिद्ध शिक्षक आहेत. त्यांचे बिहार राज्याची राजधानी पाटणा येथे कोचिंग सेंटर आहे.
नवी दिल्ली: प्रेरणा सिंग हिने बिहार लोक सेवा आयोगाच्या ६८व्या परीक्षेच्या निकालात तिसरा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे बिहारचे प्रसिद्ध शिक्षक खान सर यांनी प्रेरणा सिंगच्या यशाचा अंदाज मॉक इंटरव्ह्यूमध्येच वर्तवला होता.
हाजीपूर जिल्ह्यातील बिद्दुपूर गावातील रहिवासी असलेल्या प्रेरणा सिंगने पाटणा येथील प्रसिद्ध शिक्षक खान सर यांच्या खान ग्लोबल स्टडीज या संस्थेतून बीपीएससीची तयारी केली. बिहारमध्ये डेप्युटी एसपी पद मिळालेल्या प्रेरणा सिंगच्या म्हणण्यानूसार, एका मॉक इंटरव्ह्यूदरम्यान खान सरांनी त्यांच्या अनुभवाच्या आधारे निवडीचा अंदाज वर्तवला होता आणि तो खरा ठरला.
खान सर यांनी BPSC परीक्षेच्या निकालात तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या प्रेरणा सिंगचे तिच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. १५ जानेवारी रोजी बीपीएससीने एकत्रित स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर केला होता. ३२२ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. पाटणा शहरातील प्रियंगी मेहता हिने संपूर्ण राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.
खान सर कोण आहेत?
खान सर हे प्रसिद्ध शिक्षक आहेत. त्यांचे बिहार राज्याची राजधानी पाटणा येथे कोचिंग सेंटर आहे. कोरोना महामारीच्या काळात लादलेल्या लॉकडाऊन दरम्यान त्यांनी खान जीएस रिसर्च सेंटर या नावाने यूट्यूब चॅनल सुरू केले. या चॅनेलचे आतापर्यंत २२.४ दशलक्ष सबस्क्रायबर्स आहेत. खान सर चालू घडामोडींचे विषय इतक्या अनोख्या पद्धतीने आणि बोलक्या भाषेत समजावून सांगतात की लोकांना त्यांचा तोच व्हिडिओ अनेकदा पाहायला आवडतो. खान सरांचा जन्म डिसेंबर १९९३मध्ये उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे झाला. त्याचे वडील भारतीय लष्करात कार्यरत होते आणि मोठा भाऊही लष्करात आहे. खान सरांनी अलाहाबाद विद्यापीठातून B.Sc पदवी आणि भूगोल विषयात M.Sc पदवी प्राप्त केली आहे.