राष्ट्रपती मुखर्र्जींकडून पुन्हा सहिष्णुतेचे आवाहन
By admin | Published: November 22, 2015 03:00 AM2015-11-22T03:00:53+5:302015-11-22T03:00:53+5:30
संपूर्ण जग सध्या असहिष्णुतेमुळे निर्माण झालेल्या वाईट परिस्थितीचा सामना करीत असून, भारताची बहुविविधता टिकवून ठेवणाऱ्या मूल्यांना बळ देण्यासोबतच जगभरात त्याचा
नवी दिल्ली : संपूर्ण जग सध्या असहिष्णुतेमुळे निर्माण झालेल्या वाईट परिस्थितीचा सामना करीत असून, भारताची बहुविविधता टिकवून ठेवणाऱ्या मूल्यांना बळ देण्यासोबतच जगभरात त्याचा प्रचार-प्रसार करण्याची ही वेळ आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी केले.
भारततज्ज्ञांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जगाला अजूनही भारताकडून केवळ सहिष्णुताच नाही तर सहानुभूतीच्या विचारांची शिकवण घ्यायची आहे, या स्वामी विवेकानंदांनी दिलेल्या संदेशाचे स्मरण करून देताना भारत ज्या विचारांसाठी ओळखला जातो त्याचा पुनरुच्चार मुखर्जी यांनी केला. ते म्हणाले की, आज साऱ्या जगात असहिष्णुता आणि द्वेषाचे वातावरण पसरले असून, न भूतो न् भविष्यती अशी अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. या असहिष्णुतेशी आपल्याला संघर्ष करावा लागतो आहे.
यावेळी भारताचा आत्मा असलेले उच्च मूल्य, लिखित व अलिखित संस्कार, कर्तव्य आणि जीवनशैलीच आपल्याला या संकटातून मार्ग दाखवू शकते, असेही मुखर्जी यांनी अधोरेखित केले. गोमांस सेवनाच्या अफवेवरून दादरीत घडलेले हत्याकांड आणि त्यानंतरच्या घटनांपासूनच मुखर्जी सहिष्णुता बाळगण्याचे आवाहन करीत आहेत. (वृत्तसंस्था)