"सामाजिक न्याय ही मोदी सरकारची सर्वोच्च प्राथमिकता"; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे भाषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 23:04 IST2024-08-14T23:04:01+5:302024-08-14T23:04:30+5:30
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले

"सामाजिक न्याय ही मोदी सरकारची सर्वोच्च प्राथमिकता"; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे भाषण
President Droupadi Murmu : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला संबोधित केले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. राष्ट्राला संबोधित करताना राष्ट्रपतींनी भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि सुखदेव यांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या बलिदानाबद्दलही भाष्य केलं. तसेच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे सर्वोच्च प्राधान्य सामाजिक न्याय असल्याचेही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अनुसुचित जाती आणि जमाती आणि उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी अनेक अभूतपूर्व पुढाकार घेतले आहेत. राजकीय लोकशाहीची सातत्यपूर्ण प्रगती ही सामाजिक लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेने झालेल्या प्रगतीची साक्ष देते, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. यासोबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तानमधील फाळणीचे मानवी शोकांतिका म्हणून वर्णन केले. राष्ट्रपतींनी तमाम देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
आज १४ ऑगस्टला देश फाळणी स्मृती दिन पाळत आहे. हा दिवस फाळणीच्या भीषणतेची आठवण करून देणारा दिवस आहे. महान राष्ट्राची फाळणी होताच लाखो लोकांना स्थलांतर करण्यास भाग पाडले गेले. लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. आम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या एक दिवस आधी, आम्ही त्या अभूतपूर्व मानवी शोकांतिकेची आठवण करतो आणि त्या कुटुंबांसोबत उभे आहोत ज्यांचे हृदय दु:खी झाले होते. आम्ही संविधानाचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहोत, असे राष्ट्रपतींनी म्हटलं.
"आम्ही आमच्या राज्यघटनेचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. आपल्या नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्राला त्याच्या प्रवासात गंभीर अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे. न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या घटनात्मक आदर्शांना घट्ट धरून, भारताला जागतिक स्तरावर त्याचे वैभवशाली स्थान परत मिळावे यासाठी आम्ही मिशन घेऊन पुढे जात आहोत," असेही राष्ट्रपती म्हणाल्या.