“राम मंदिराचे स्वप्न पूर्ण, चंद्रयान ३ यशस्वी झाले; देश वेगाने पुढे जातोय”: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 12:12 PM2024-01-31T12:12:29+5:302024-01-31T12:13:25+5:30

President Droupadi Murmu In Parliament Budget Session 2024: राम मंदिराचा उल्लेख करताच सदस्यांच्या जय श्रीराम अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. यामुळे काही काळ राष्ट्रपतींना भाषण थांबवावे लागले.

president droupadi murmu addresses a joint session of both houses at the new parliament building in budget session 2024 | “राम मंदिराचे स्वप्न पूर्ण, चंद्रयान ३ यशस्वी झाले; देश वेगाने पुढे जातोय”: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

“राम मंदिराचे स्वप्न पूर्ण, चंद्रयान ३ यशस्वी झाले; देश वेगाने पुढे जातोय”: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

President Droupadi Murmu In Parliament Budget Session 2024: संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू झाले आहे. ०१ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तत्पूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेत केलेल्या अभिभाषणात गेल्या वर्षभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख केला. जगात भारत ही वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. यावेळी राम मंदिराचा उल्लेख करताच सभागृहातील खासदारांनी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या. यामुळे अगदी काही वेळासाठी राष्ट्रपतींना आपले भाषण थांबवावे लागले.

भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे. गेल्या सलग दोन तिमाहीत भारताचा विकास दर ७.५ टक्के राहिला आहे. चंद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. ऐतिहासिक जी-२० परिषदेच्या यशस्वी आयोजनामुळे जगात भारताचा मान वाढला आहे. इस्रोने आदित्य एल१ मोहीम हाती घेऊन नवा इतिहास घडवाल आहे. तसेच देशातील सर्वांत मोठ्या सागरी सेतू असलेल्या अटल सेतूचे लोकार्पण झाले आहे, असे राष्ट्रपतींनी नमूद केले.

राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले

राम मंदिराचे अनेक शतकांपासूनचे स्वप्न साकार झाले आहे, असा उल्लेख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी करताच पंतप्रधान मोदी यांनी जोरात बेंच वाजवत प्रतिसाद दिला. तसेच जय श्रीराम या घोषणांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेले. या सर्व प्रकारामुळे राष्ट्रपतींना काही वेळासाठी आपले भाषण थांबवावे लागले. पुढे बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद ३७० वर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने झालेले शिक्कामोर्तब, तीन तलाक कायदा, नारी शक्ति वंदन कायदा, नवीन न्याय संहिता कायदा, अशा अनेक गोष्टींचा गोषवारा राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात घेतला. 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणातील काही ठळक मुद्दे

- पूर्णपणे कोलमडलेली बँकिंग व्यवस्था आज जगातील सर्वात मजबूत बनली आहे. पूर्वी दुहेरी अंकी असलेला NPA आता फक्त ४ टक्के आहे. 

- काही वर्षांपूर्वी भारत खेळणी आयात करायचा, आज मेड इन इंडिया खेळणी निर्यात करत आहे. 

- भारताच्या संरक्षण प्रकल्पाने एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तेजस हे लढाऊ विमान आता आपल्या हवाई दलाची ताकद बनले आहे.

- केंद्र सरकार भारतात इज ऑफ डुइंग बिझनेसवर भर देत आहे. केंद्र सरकारची आणखी एक मोठी सुधारणा म्हणजे डिजिटल इंडिया मोहीम. डिजिटल इंडियामुळे भारतात व्यवसाय करणे सोपे झाले आहे.

- युवाशक्ती, महिला शक्ती, शेतकरी आणि गरीब या चार अत्यंत महत्त्वाच्या चार स्तंभांच्या बळावर हा देश उभा आहे. 

- १० कोटींहून अधिक लोकांना कायमस्वरूपी घरे मिळाली आहेत. ११ कोटी ग्रामस्थांपर्यंत पाईपने पाणी पोहोचले आहे. 

- कोरोनाच्या काळात ८० कोटी देशवासीयांना मोफत रेशन दिले. आता येत्या ५ वर्षांसाठी ही योजना वाढवण्यात आली आहे. 

- १५ नोव्हेंबरपासून विकास भारत संपर्क यात्रा सुरू असून आतापर्यंत सुमारे १९ कोटी देशबांधव या यात्रेत सहभागी झाले आहेत. 

- गेल्या दोन वर्षांत जगाने दोन युद्धे आणि कोरोनासारखी महामारी पाहिली आहे. असे असतानाही केंद्र सरकारने देशातील महागाई नियंत्रणात ठेवली. सर्वसामान्य भारतीयांवर बोजा वाढू दिला नाही. 

- २०१४ पूर्वी १० वर्षांत सरासरी महागाई दर ८ टक्क्यांहून अधिक होता. परंतु, गेल्या दशकांतील सरासरी चलनवाढ ५ टक्के राहिली. 

- पूर्वी देशवासीयांच्या २ लाखांच्या उत्पन्नावर कर आकारला जात होता. आज भारतात ७ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही.

- केंद्र सरकारने शेतीचा खर्च कमी करून नफा वाढवला आहे. पहिल्यांदाच देशातील कृषी आराखड्यात १० कोटींहून अधिक शेतकऱ्यांना महत्त्व दिले आहे. 

- पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना २ लाख ८० हजार कोटी रुपये मिळाले आहेत. दोन वर्षांत शेतकऱ्यांसाठी बँकांकडून सुलभ कर्जात तिप्पट वाढ करण्यात आली आहे. 

- गेल्या १० वर्षांत शेतकऱ्यांना MSP च्या माध्यमातून अंदाजे १८ लाख कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना स्वस्त खते मिळावीत यासाठी १० वर्षांत ११ लाख कोटींहून अधिक खर्च करण्यात आला.

- जी गावे विकासाच्या प्रवाहापासून दूर राहिली, त्यांना आता मुख्य प्रवाहात आणले जात आहे. अशा आदिवासी गावांमध्ये वीज पोहोचली आहे. पाईपने पाणी मिळू लागले आहे. हजारो आदिवासी बहुल गावांना 4G इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे. सर्वाधिक मागास घटकांसाठी २६ हजार कोटी रुपयांची पंतप्रधान जनमान योजना आणली आहे.

- ८४ लाखांहून अधिक लोक पीएम विश्वकर्मा योजनेत सहभागी झाले आहेत.

 

Web Title: president droupadi murmu addresses a joint session of both houses at the new parliament building in budget session 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.