President Election 2022: राष्ट्रपती निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींचं शरद पवार, उद्धव ठाकरेंसह २२ नेत्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 05:39 PM2022-06-11T17:39:09+5:302022-07-04T19:08:05+5:30
राष्ट्रपती निवडणूक जवळ आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे.
नवी दिल्ली - राज्यसभेनंतर आता सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आगामी राष्ट्रपती निवडणुकीकडे लागले आहे. राष्ट्रपती निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर मतांची जुळवाजुळव करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक तयारीला लागलेत. आतापर्यंत सत्ताधारी एनडीएनं त्यांच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही. परंतु राष्ट्रपती निवडणुकीच्या दृष्टीने प्रभावी विरोध पक्षाची मूठ बांधण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रपती निवडणूक १८ जुलै रोजी होणार असून २१ जुलै रोजी मतदानाचा निकाल लागणार आहे.
तृणमूल काँग्रेसनं म्हटलंय की, राष्ट्रपती निवडणूक जवळ आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे. विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी त्यांनी १५ जून रोजी दिल्लीत संयुक्त बैठकीचं आयोजन करत विरोधी पक्षातील मुख्यमंत्री आणि नेत्यांना पत्र पाठवलं आहे. त्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केरळचे पिनाराई विजयन, ओडिशाचे नवीन पटनायक, तेलंगणाचे के चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे एमके स्टालिन, महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे, झारखंडचे हेमंत सोरेन, पंजाबचे भगवंत मान आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह २२ प्रमुख नेत्यांना पत्र पाठवलं आहे.
या बैठकीला उपस्थित राहणाऱ्या नेत्यांची नावे
१. अरविंद केजरीवाल (मुख्यमंत्री, दिल्ली)
२. पिनाराई विजयन (मुख्यमंत्री, केरळ)
३. नवीन पटनायक (मुख्यमंत्री, ओडिशा)
४. कलवकुंतला चंद्रशेखर राव (मुख्यमंत्री, तेलंगणा)
५. थिरु एमके स्टालिन (मुख्यमंत्री, तमिलनाडू)
६. उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र)
७. हेमंत सोरेन (मुख्यमंत्री, झारखंड)
८. भगवंत सिंह मान (मुख्यमंत्री, पंजाब)
९. सोनिया गांधी (अध्यक्ष, कांग्रेस)
१०. लालू प्रसाद यादव (अध्यक्ष, राजद)
११. डी. राजा (महासचिव, भाकपा)
१२. सीताराम येचुरी (महासचिव, सीपीआईएम)
१३. अखिलेश यादव (अध्यक्ष, समाजवादी पार्टी)
१४. शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी)
१५. जयंत चौधरी (राष्ट्रीय अध्यक्ष, रालोद)
१६. एच. डी. कुमारस्वामी (कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री)
१७. एच डी देवेगौड़ा (खासदार, भारताचे माजी पंतप्रधान)
१८. फारूक अब्दुल्ला (अध्यक्ष, जेकेएनसी)
१९. महबूबा मुफ्ती (अध्यक्ष, पीडीपी)
२०. एस सुखबीर सिंह बादल (अध्यक्ष, शिरोमणि अकाली दल)
२१. पवन चामलिंग (अध्यक्ष, सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंट)
२२. के एम कादर मोहिदीन (अध्यक्ष, आईयूएमएल)
Our hon'ble chairperson @MamataOfficial calls upon all progressive opposition forces to meet and deliberate on the future course of action keeping the Presidential elections in sight; at the Constitution Club, New Delhi on the 15th of June 2022 at 3 PM. pic.twitter.com/nrupJSSbT8
— All India Trinamool Congress (@AITCofficial) June 11, 2022
राष्ट्रपती निवडणूकीसाठी लागणाऱ्या मतांचे गणित समजून घ्या
आजपर्यंत राज्यांमध्ये एकूण ४७९० आमदार आहेत. त्यांच्या मतांची किंमत ५.४ लाख (५,४२,३०६) आहे. खासदारांची संख्या ७६७ आहे ज्यांचे एकूण मत मूल्य देखील सुमारे ५.४ लाख (५,३६,९००) आहे. अशा प्रकारे राष्ट्रपती निवडणुकीसाठी एकूण मते अंदाजे १०.८ लाख (१०,७९,२०६) आहेत. राज्यातील लोकसंख्या आणि आमदारांच्या संख्येच्या आधारे आमदाराच्या मताचे मूल्य ठरविले जाते. खासदारांच्या मतांचे मूल्य आमदारांच्या एकूण मतांना लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांच्या संख्येने भागून ठरवले जाते. NDA कडे ५,२६,४२० मते आहेत. यूपीएकडे २,५९,८९२ मते आहेत. इतरांकडे (तृणमूल काँग्रेस, वायएसआरसीपी, बीजेडी, सपा आणि डावे) २,९२,८९४ मते आहेत. अशा परिस्थितीत जर विरोधकांनी एकत्र येत तगडा उमेदवार दिला तर राष्ट्रपती निवडणुकीत भाजपाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो.