President Election: शरद पवारांनी ऑफर नाकारल्यानंतर आता गांधींचे नातू बनणार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 02:20 PM2022-06-15T14:20:38+5:302022-06-15T14:21:11+5:30
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १५ जून रोजी दिल्लीत बैठकीचं आयोजन करत देशातील प्रमुख २२ नेत्यांना निमंत्रण पाठवलं होते.
नवी दिल्ली - देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी येत्या १८ जुलैला निवडणूक होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधीपक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार कोण असणार? यावर अद्याप स्पष्टता नाही. मात्र विरोधी पक्षाच्या संयुक्त बैठकीत त्यावर निर्णय होईल. परंतु तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी एकतर्फी अशी बैठक बोलावल्याने कम्युनिट पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. तर आप, टीआरएस या बैठकीत सहभागी होणार नाही.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १५ जून रोजी दिल्लीत बैठकीचं आयोजन करत देशातील प्रमुख २२ नेत्यांना निमंत्रण पाठवलं होते. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. मात्र येंचुरी यांनी पत्र लिहून बैठक बोलावण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला. नेहमीप्रमाणे विरोधी पक्षांमध्ये चर्चा होऊन अशाप्रकारे बैठकीचं आयोजन केले जाते. जेणेकरून या बैठकीला जास्तीत जास्त पक्षांना सहभागी होता येईल. परंतु यंदा तारीख, वेळ, स्थळ आणि अजेंडा माहिती देणारं एकतर्फी पत्र मिळालं. या पत्रात आणि बैठकीत केवळ ३ दिवसांचे अंतर होते. जर योग्य प्रकारे चर्चा करून बैठकीचं आयोजन केले असते तर कदाचित जास्त प्रतिसाद मिळाला असता अशी नाराजी सीताराम येंचुरी यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रपती निवडणूक लढवणार नाही - पवार
ममता बॅनर्जी यांनी आणि डाव्या विचारसरणीच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदासाठी संयुक्त उमेदवार म्हणून उभे राहण्याची विनंती केली. परंतु शरद पवारांनी(Sharad Pawar) विरोधकांची ही ऑफर नाकारली. सीताराम येंचुरी म्हणाले की, पवार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उभे राहणार नाही अन्य नावाचा विचार केला जाऊ शकतो. विरोधी पक्षाच्या सूत्रांनुसार, शरद पवार अशा निवडणुकीत उभे राहण्यास इच्छुक नाहीत ज्यात त्यांच्या राजकीय जीवनात पराभव सहन करावा लागू शकतो.
गोपाळकृष्ण गांधी विरोधी पक्षाचे उमेदवार?
राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांनी ऑफर नाकारल्यानंतर आता विरोधकांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी(Gopalkrishna Gandhi) यांच्याशी संपर्क साधला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गांधी २०१७ मध्ये उपराष्ट्रपतीपदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार होते. परंतु व्यैकया नायडू यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. काही विरोधी पक्षातील नेत्यांनी गोपाळकृष्ण गांधी यांना राष्ट्रपती निवडणुकीत संयुक्त उमेदवार म्हणून उभे राहण्याची विनंती करत विचार करण्याचा आग्रह केला आहे.
कोण आहेत गोपाळकृष्ण गांधी?
विरोधी पक्षांकडून अन्य नावांचाही विचार केला जात आहे. गोपाळकृष्ण गांधी हे २००४ ते २००९ या काळात पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. गोपाळकृष्ण गांधी यांचा जन्म २२ एप्रिल १९४५ रोजी महात्मा गांधी यांचे छोटे चिरंजीव देवदास गांधी यांच्या घरी झाला. १९६८ ते १९९२ पर्यंत गोपाळकृष्ण गांधी आयएएस अधिकारी होते. १९९२ मध्ये त्यांनी स्वच्छेने निवृत्ती घेतली. १९८५ ते १९८७ काळात हे उपराष्ट्रपती कार्यालयात सचिव होते.