President Election: राष्ट्रपतीपदासाठी NDA कडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी: भाजपाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 09:45 PM2022-06-21T21:45:55+5:302022-06-21T22:14:22+5:30
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर भाजपाकडूनही उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.
नवी दिल्ली - राष्ट्रपतीपदासाठी येत्या १८ जुलैला निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने चर्चा करून एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी याबाबत घोषणा केली. तर दुसरीकडे विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले आहेत. राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला मतदान होणार असून २१ जुलैला देशाला नवे राष्ट्रपती मिळतील.
याबाबत जे. पी नड्डा म्हणाले की, एनडी घटक पक्षांशी चर्चा केल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले आहे. पूर्वांचल भागातून कुणी उमेदवार असावं असं ठरवलं होते. त्यात आदिवासी भागातील महिला नेतृत्व द्रौपदी मुर्मू यांना संधी देण्यात येत आहे. आम्हाला अपेक्षा होती राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होईल परंतु विरोधकांनी त्यांच्या उमेदवाराची घोषणा आधीच केले असं त्यांनी सांगितले.
For the first time, preference has been given to a woman tribal candidate. We announce Draupadi Murmu as NDA's candidate for the upcoming Presidential elections: BJP chief JP Nadda pic.twitter.com/1Hh4Jank5v
— ANI (@ANI) June 21, 2022
कोण आहे द्रौपदी मुर्मू?
ओडिशा येथील आदिवासी समाजाचं नेतृत्व असलेल्या द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या सर्वाधिक काळ राज्यपाल राहिल्या आहेत. त्या देशातील पहिल्या आदिवासी महिला राज्यपाल आहेत. ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात राहणाऱ्या द्रौपदी मुर्मू या दोनदा रायरंगपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपा आमदार होत्या. भाजपा आणि बीजू जनता दलाच्या सरकारमध्ये त्या मंत्री होत्या.
यशवंत सिन्हा विरोधकांचे उमेदवार
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. यशवंत सिन्हा यांचे नाव तृणमूल काँग्रेसनं समोर आणले होते. यशवंत सिन्हा हे चंद्रशेखर आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये अर्थ मंत्री म्हणून काम केले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत महत्त्वपूर्ण निर्णयात यशवंत सिन्हा यांचे योगदान आहे. यशवंत सिन्हा यांनीच संसदेत बजेट मांडण्यासाठीची वेळ संध्याकाळी ५ ऐवजी सकाळी ११ वाजता केली होती.