President Election: पवार, अब्दुल्लांचा नकार, आता कोण असेल विरोधकांचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार, ही तीन नावं चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 12:57 PM2022-06-20T12:57:30+5:302022-06-20T12:58:12+5:30
President Election 2022: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि नॅशनल कॉन्फ्रन्सचे फारुख अब्दुल्ला यांनी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी स्वीकारण्यास नकार दिल्याने विरोधकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
नवी दिल्ली - देशाच्या नव्या राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी १८ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी केंद्रातील सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि नॅशनल कॉन्फ्रन्सचे फारुख अब्दुल्ला यांनी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी स्वीकारण्यास नकार दिल्याने विरोधकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, राष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची २९ जून ही अखेरची तारीख असल्याने उमेदवार निवडीसाठी विरोधी पक्षांकडून नव्या उमेदवारांसाठी चाचपणी सुरू आहे.
त्यामधून विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी तीन नावं चर्चेत आली आहेत. विरोधी पक्षांकडून गोपालकृष्ण गांधी, यशवंत सिन्हा आणि एन.के. प्रेमचंद्रन यांच्या नावांचा विचार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सुरू आहे. त्यामुळे आता विरोधी पक्ष राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून विचार सुरू असलेले गोपालकृष्ण गांधी हे महात्मा गांधींचे नातू आहेत. पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल असलेल्या गोपालकृष्ण गांधी यांचं नाव बऱ्याच दिवसांपासून राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर आहे. याआधी २०१९ मध्ये विरोधी पक्षांनी २०१७ च्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता.
भाजपाचे माजी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचही नाव राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून चर्चेत आहे. यशवंत सिन्हा हे भाजपाच्या बड्या नेत्यांपैकी एक आहेत. तसेच सध्या ते तृणमूल काँग्रेसमध्ये आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कडवे विरोधक म्हणून त्यांची ओळख आहे.
तर केरळमधील खासदार एन. के. प्रेमचंद्रन हे केरळ सरकारमध्ये मंत्री होते. त्यांचं नाव राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी पुढे आणून दक्षिणेतील पक्षांचा पाठिंबा मिळवणे ही विरोधी पक्षांची रणनीती आहे. त्याचं कारण म्हणजे ममता बॅनर्जींनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला आंध्र प्रदेशमधील वायएसआर काँग्रेस आणि तेलंगाणामधील टीआरएसने अनुपस्थिती दर्शवली होती. यामधील एका जरी पक्षाने भाजपाला पाठिंबा दिला तरी भाजपाचा उमेदवाराचा सहजपणे विजय होऊ शकतो.