महाराष्ट्रातील सहा अधिकारी व जवानांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 11:02 AM2021-11-23T11:02:06+5:302021-11-23T11:04:38+5:30
राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये संरक्षण मंत्रालयाच्या वतीने सोमवारी (दि. २२) दोन टप्प्यांत ‘संरक्षण अलंकरण पुरस्कार -२०२०’ चे वितरण करण्यात आले.
तिन्ही संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज संरक्षण अलंकरण पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्रातील पाच अधिकारी व जवानांचा समावेश आहे.
राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये संरक्षण मंत्रालयाच्या वतीने सोमवारी (दि. २२) दोन टप्प्यांत ‘संरक्षण अलंकरण पुरस्कार -२०२०’ चे वितरण करण्यात आले. सकाळी आणि सायंकाळी आयोजित या पुरस्कार वितरण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी अधिकारी व जवानांना उल्लेखनीय शौर्य, दुर्दम्य साहस आणि समर्पण वृत्तीच्या प्रदर्शनासाठी कीर्ती चक्र, शौर्य चक्र, परम विशिष्ट पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक अशा विविध सन्मानाने गौरविण्यात आले.
परम विशिष्ट तसेच अतिविशिष्ट सेवा पदक
महाराष्ट्राचे सुपुत्र एअर मार्शल प्रदीप बापट यांना परम विशिष्ट सेवा पदक तर व्हाईस ॲडमिरल किरण देशमुख, एअर व्हाईस मार्शल निखील चिटणीस आणि एअर कमोडोर मकरंद रानडे यांना अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले. कॅप्टन महेश कुमार भुरे यांना असामान्य साहसासाठी शौर्य चक्र प्रदान करण्यात आले.
धोंडियाल, सोम्बिर यांची शौर्यगाथा -
काश्मीरमध्ये फेब्रुवारी २०१९मध्ये झालेल्या एका चकमकीत मेजर विभूतीशंकर धोंडियाल शहीद झाले. त्यांना मरणोत्तर शौर्यचक्र देण्यात आले. फेब्रुवारी २०१९मध्येच काश्मीरमध्ये झालेल्या एका चकमकीत नायब सुभेदार सोम्बिर शहीद झाले. त्यांचा मरणोत्तर शौर्यचक्र देऊन गौरव करण्यात आला.