...अन् कुशाग्र बुद्धीच्या जोरावर 'त्यानं' लकवाग्रस्त शरीराला केलं 'चेकमेट'!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 04:41 PM2020-01-25T16:41:17+5:302020-01-25T17:58:33+5:30

 शरीर म्हणून वाट्याला फक्त थरथरणारी बोटं, आणि अत्यंत कुशाग्र बुद्धी सोबतीला होती.

President Kovind presented the Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar, 2020 at Rashtrapati Bhavan | ...अन् कुशाग्र बुद्धीच्या जोरावर 'त्यानं' लकवाग्रस्त शरीराला केलं 'चेकमेट'!

...अन् कुशाग्र बुद्धीच्या जोरावर 'त्यानं' लकवाग्रस्त शरीराला केलं 'चेकमेट'!

Next

- अनुप देवधर

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बुधवारी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने 49 मुलांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये जयपुरमधील 18 वर्षीय हृदयेश्वर सिंह भाटी याचा देखील समावेश आहे. हृदयेश्वरचं शरीर 80 टक्के लकवाग्रस्त झालेलं असलं तरी त्याने हार न मानता बुद्धीच्या जोरावर जगातील सर्वात लहान दिव्यांग पेटंटधारकाचा किताब हृदयेश्वरने आपल्या नावावर केला आहे.

हृदयेश्वर वयाच्या चौथ्या वर्षी एक दिवस अचानक चालता चालता तो पडला. मग समजला त्याला जन्मतः असलेला ड्यूशिन मस्कुलर डिस्ट्रोफी नावाचा आजार. आयुष्यं बघताबघता व्हीलचेअरवर आलं. शरीर म्हणून वाट्याला फक्त थरथरणारी बोटं, आणि अत्यंत कुशाग्र बुद्धी सोबतीला होती.

वाट्याला आलेलं परावलंबी जीवन बघून आपल्यासारख्या एखाद्यानं हाय खाल्ली असती. पण हृदयेश्वरनं आपल्या वाट्याला आलेल्या त्याच थरथरत्या बोटांच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर एक खेळ शोधून काढला. सोंगट्या गोलाकार ठेऊन सहा जणांत खेळता येणारा बुद्धिबळाचा खेळ.

हृदयेश्वरने वयाच्या 9व्या वर्षी 3 पेटंट स्वतःच्या नावावर करून देशातला सर्वात कमी वयाचा पेटंटधारक बनला. तसेच जगातला सर्वात लहान दिव्यांग पेटंटधारक असलेला किताब देखील आपल्या नावावर केला. तसेच हृदयेश्वरने  बनवलेल्या 'पॉवर व्हील चेअर ऍक्सेसीबीलिटी व्हेईकल मेकॅनिझम' जगातल्या हजारो व्हीलचेअरवरचं आयुष्यं जगणाऱ्या लोकांना मदत करत आहे.

आयुष्यात बऱ्याच वेळी आपल्याला पूर्णतः असहाय्य वाटू लागतं, पूर्णतः पराभूत झाल्यासारखं वाटतं. ज्याक्षणी सर्वकाही संपतंय की काय अशी अनामिक भीती वाटु लागती, आणि पुढचा मार्ग अस्पष्ट होईल, दिसेनासं होऊ लागेल तेव्हा जरासुध्दा कच न खाता, माघार न घेता फक्त हृदयेश्वर सारख्या नीडर लढवय्यांकडे बघावं.

नव्या दमानं, नव्या उमेदीनं, नव्या उत्साहानं तो तुम्हाला जगण्याचं नवं बळ देईल, कारण आयुष्यात अपमान,अपयश आणि पराभव ह्या गोष्टी पण गरजेच्या असतात. त्यातुन जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो आपल्यातलाच खंबीर आणि अभेद्य माणुस.जीवनात येणारी प्रत्येक वादळं, संकटं, अडचणी ही आपल्याला उध्वस्त करण्यासाठीच नसतात, तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठीही असतात.


 

Web Title: President Kovind presented the Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar, 2020 at Rashtrapati Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.