२६ जानेवारीला राष्ट्रपती तर १५ ऑगस्टला पंतप्रधान; ध्वजारोहणाची अशीही स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 11:19 AM2024-01-26T11:19:00+5:302024-01-26T11:20:52+5:30
देशात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. तर २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा होतो.
मुंबई - देशभरात ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असून देश तिरंग्यात रंगून गेला आहे. राजपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थित पथसंचलन आणि सैन्य दलाच्या कसरतींनी उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राजधानी दिल्लीत ध्वजारोहण झाल्यानंतर देशभरातील तिरंगा फडकला असून सर्वत्र देशभक्तीचा माहोल पाहायला मिळत आहे. १५ ऑगस्ट आणि १६ जानेवारी रोजी देशभरात वेगळाच आनंद दिसून येतो. या दोन्ही दिवशी ध्वजारोहण केले जाते. मात्र, दोन्ही दिवसांतील ध्वजारोहणात फरक आहे.
देशात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. तर २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा होतो. देशात यंदा ७५ वा अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. सर्वप्रथम २६ जानेवारी १९५० रोजी पहिला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला होता. या दिवशी देशाचे संविधान अस्तित्वात आले होते. त्यामुळे, लोकशाही जपणारे आणि लोकशाहीवर चालणारे गणराज्य म्हणून भारताची जगभरात ओळक बनली.
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी देशभरात तिरंगा फडकवला जातो. मात्र, या दोन्ही दिवशीच्या ध्वजारोहणामध्ये फरक असतो. १५ ऑगस्ट रोजी झेंड्याच्या खालील बाजुने रस्सी खेचून ध्वज वरपर्यंत नेला जातो आणि तिरंगा फडकवला जातो. त्यास, ध्वजारोहण (फ्लॅग होस्टींग) असं म्हणातात. देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ब्रिटीश सरकारने त्यांचा झेंडा उतरवून भारताचा तिरंगा वरी नेऊन फडकावला होता. त्यामुळे, त्या पद्धतीने १५ ऑगस्टो रोजी ध्वजारोहण केले जाते.
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी झेंडा पहिल्यापासूनच वरी बांधलेला असतो. राष्ट्रपतींच्याहस्ते हा झेंडा दोरीने खोलून फडकावला जातो. त्यास, झेंडा फडकावणे असं म्हणतात. प्रजासत्ताक दिनी राजपथावर राष्ट्रपतींच्याहस्ते झेंडावंदन केले जाते. तर, १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्याहस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले जाते. पंतप्रधान हे देशाचे प्रमुख असल्याने स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरुन त्यांच्याहस्ते झेंडांवंदन केले जाते. तर, राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख असल्याने २६ जानेवारी रोजी त्यांच्याहस्ते झेंडा फडकवला जातो. प्रजासत्ताक दिनी दुसऱ्या देशातील मान्यवरांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले जाते. तर, १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती हेच प्रमुख पाहुणे असतात. यंदा २६ जानेवारी रोजी प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्रपती इमैनुअल मैक्रां हे भारतात आले आहेत.