लोकांचे राष्ट्रपती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2015 05:30 AM2015-07-28T05:30:46+5:302015-07-28T05:30:46+5:30

आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले. त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून

President of the People ... | लोकांचे राष्ट्रपती...

लोकांचे राष्ट्रपती...

Next

अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम (जन्म १५ आॅक्टोबर १९३१, तमिळनाडू ) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (२५ जुलै २००२ ते २५ जुलै २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले. त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्या-आणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वत:चे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले.
या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील ‘नासा’ या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी संबंध आला. १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही (सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला, त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये दाखल झाले. स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे.
भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभार्इंचेच नाव दिलेल्या विक्रम साराभाई अवकाश
केंद्राचे ते प्रमुख झाले. वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती.
क्षेपणास्त्र विकास कार्यामधील ‘अग्नी’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओचे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजविण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने ‘पद्मभूषण’, ‘पद्यविभूषण’ व १९९८ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.

Web Title: President of the People ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.