विद्यार्थ्यांत विद्यार्थी होऊन रमले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
By Admin | Published: September 4, 2015 10:41 PM2015-09-04T22:41:40+5:302015-09-04T22:41:40+5:30
दिल्लीच्या प्रेसिडेन्शियल इस्टेटस्थित डॉ. राजेंद्र प्रसाद सर्वोदय विद्यालयाच्या इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेला वर्ग
नवी दिल्ली : दिल्लीच्या प्रेसिडेन्शियल इस्टेटस्थित डॉ. राजेंद्र प्रसाद सर्वोदय विद्यालयाच्या इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेला वर्ग आणि या वर्गासमोर एका दिवसासाठी शिक्षकाच्या भूमिकेत शिकवायला उभे राहिलेले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी. शिकवता शिकवता एका क्षणी प्रणव मुखर्जी विद्यार्थ्यांतीलच एक होऊन गेले आणि विद्यार्थिदशेतील स्मृतीत रमले. मी अतिशय खोडकर होतो. अंधाराला घाबरायचो, अशी कितीतरी ‘गुपिते’ त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उघड केली.
शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रणव मुखर्जी यांनी डॉ. राजेंद्र प्रसाद सर्वोदय विद्यालयाच्या इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांचा वर्ग घेतला. आपल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींनी ‘भारताचा स्वातंत्र्यसंग्राम आणि राजकारण’ हा विषय शिकवला. राष्ट्रपतींना ऐकण्यासाठी विद्यार्थी आतुर असतानाच, त्यांनी अतिशय नम्रपणे शिक्षक या नात्याने वर्गात प्रवेश केला. मी या वर्गात राष्ट्रपती या नात्याने नव्हे, तर तुमचा शिक्षक या नात्याने आलो आहे. मला ‘राष्ट्रपती सर’ संबोधण्याऐवजी ‘मुखर्जी सर’ म्हणा... माझ्यामुळे कंटाळलाच तर नि:संकोचपणे सांगा... अशा वाक्यांनी त्यांनी आपल्या वर्गाची सुरुवात केली आणि मग हळूहळू नकळतपणे विद्यार्थ्यांच्या मनाचा ताबा घेतला.
आपल्या बालपणीच्या अनेक आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. मी अतिशय खोडकर होतो. आई माझ्यामुळे अगदी वैतागायची. दिवसभराच्या खोड्या व अन्य गोष्टींमुळे मला अनेकदा तिच्या हातचा ‘प्रसाद’ मिळायचा; पण काही तासानंतर ती माझ्याजवळ यायची आणि मला लाडाने गोंजारायची. मी सूर्याेदयापासून सूर्यास्तापर्यंत काय काय केले, हा प्रश्न ती न चुकता विचारायची. मीही अगदी क्रमवारीने काय काय केले ते तिला सांगायचो, अशी एक तरल आठवण त्यांनी विद्यार्थ्यांना ऐकवली.
पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्याच्या मिराती गावात स्वातंत्र्यसेनानी कामदा किंकर मुखर्जी आणि राजलक्ष्मी या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या प्रणव मुखर्जींनी आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आपल्या आईलाच दिले.