संघर्ष करणाऱ्यांनी महात्मा गांधींचा अहिंसेचा मंत्र लक्षात ठेवावा- राष्ट्रपती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 08:48 PM2020-01-25T20:48:50+5:302020-01-25T21:49:11+5:30
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना उद्देशून राष्ट्रपतींचं भाषण
नवी दिल्ली: कोणत्याही कारणासाठी संघर्ष करणाऱ्यांनी महात्मा गांधींनी दिलेला अहिंसेचा मंत्र लक्षात ठेवायला हवा, अशा शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांना संबोधित केलं. सध्या देशात अनेक ठिकाणी सुधारित नागरिकत्व कायद्यात आंदोलनं सुरू आहेत. काही भागांत आंदोलनांना हिंसक वळणदेखील लागलं आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींचं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे.
महात्मा गांधींचे विचार राष्ट्र निर्माणासाठी आजही सुसंगत आहेत. सत्य आणि अहिंसा या त्यांच्या तत्त्वांची आज जास्त आवश्यकता आहे. कोणत्याही उद्देशानं संघर्ष करणाऱ्यांनी, विशेषत: तरुणांनी गांधीजींचा अहिंसेचा विचार सदैव लक्षात ठेवायला हवा. गांधींजींनी दिलेला हा विचार संपूर्ण मानवतेसाठी खूप मोठी देणगी आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपतींनी केलं. गेल्या काही दिवसांमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, जामिया मिलिया विद्यापीठात विद्यार्थ्यांची आंदोलनं सुरू आहेत. या विद्यापीठांमध्ये हिंसाचाराच्या घटनादेखील घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी हे आवाहन केल्याचं बोललं जात आहे.
राष्ट्रपतींनी त्यांच्या संदेशातून सत्ताधारी आणि विरोधकांना एकत्र येण्याचं आवाहनही केलं. 'लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधकांची भूमिका महत्त्वाची असते. त्यांनी त्यांची राजकीय भूमिका पार पाडताना देशाचा विकास आणि देशवासीयांच्या कल्याणासाठी सोबत काम करायला हवं. विकासाच्या मार्गानं वाटचाल करताना आपला देश, देशाचे नागरिक, जगाला सहाय्य करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहोत. मानवतेच्या भविष्याच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू,' असं राष्ट्रपतींनी म्हटलं.