President Ram Nath Kovind: 'कोरोना संपलेला नाही, देशवासीयांनी लवकरात लवकर लस घ्यावी', स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 08:05 PM2021-08-14T20:05:58+5:302021-08-14T20:06:42+5:30
देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांना संदेश दिला.
देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांना संदेश दिला. "देश-विदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणा सर्वांसाठी हा दिवस अतिशय आनंदाचा दिवस असतो. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळी देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिल्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांचं स्वप्न साकार झालं होतं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धापूर्वक नमन करतो", असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.
"नुकतंच संपन्न झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी आपल्या देशाचं नाव उंचावलं. मी देशातील प्रत्येक पालकांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी आपल्या प्रतिभावान मुलांना शिक्षणासोबतच त्यांच्यातील कलागुणांना वाव द्यायला हवा", असंही राष्ट्रपती म्हणाले.
कोरोना महामारीबाबत बोलताना राष्ट्रपती म्हणाले की, ''कोरोना प्रादुर्भावाची तीव्रता कमी झालेली असली तरी त्याचा प्रभाव अद्याप संपलेला नाही. देशातील डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात टाकून नागरिकांची सेवा करत आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात यश येताना दिसत आहे. देशातील सर्व नागरिकांनी कोरोना प्रोटोकॉलचं पालन केलं पाहिजे आणि तातडीनं कोरोना विरोधी लसीकरण पूर्ण केलं पाहिजे. यासोबतच इतरांनाही लसीकरण करून घेण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं. सध्या कोरोनाविरोधात लसीकरण हेच सर्वात प्रभावी सुरक्षा कवच आहे. त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं असं मी आवाहन करतो".